रत्नागिरी : गुहागरमध्ये भाजपच्या नगरसेवकाने गुंडगिरी करत एका वृद्ध महिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जांभ्या दगडाने भरलेल्या गाडीला बाजू देण्याच्या वादातून या नगरसेवकाने वृद्ध महिलेला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. जखमी वृद्धेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वृद्ध महिलेला जबर मार बसला आहे. गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या वृद्ध महिलेला भाजपचा नगरसेवक अरुण रहाटे याने मारहाण केली. त्याच्यासोबत त्याचा मुलगा आणि अन्य एका व्यक्तीनेदेखील या वृद्ध महिलेला मारहाण केली, तसा आरोप या महिलेने केला आहे.
भाजप नगरसेवकाच्या या गुंडगिरी कृत्यामुळे गुहागरमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या नगरसेवकाच्या विरोधात पीडित महिलेच्या मुलाने गुहागर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नगरसेवक अरुण रहाटे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.