नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं

विमान जळून खाक

Updated: Jun 27, 2018, 12:33 PM IST

नाशिक : नाशिकमध्ये आज सकाळीच एक दुर्घटना घडलीय. नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळून अपघातग्रस्त झालंय. सुदैवानं वैमानिक सुखरुप असल्याची माहिती मिळतेय. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत जवळच्या वावी ठुशी गावच्या ओझर मिग शिवारात वायुदलाचं लढाऊ सुखोई विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलं. त्यात विमान जळून खाक झालंय तर विमानाच्या दोन पायलटने उडी मारल्याने ते बचावल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.  

घटना समोर आल्यानंतर तातडीनं मदतकार्य सुरू करण्यात आलंय. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आलं. त्यामुळे विमानाच्या दोन्ही पायलटनं पॅराशुटच्या साहाय्यानं उडी मारली. त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमान जळत्या अवस्थेतच खाली कोसळलं. यात विमानाचे पत्रे व जळणारे भाग उडाले. ते शेतात काम करणाऱ्या काही मजुरांना लागल्यानं ते जखमी झालेत. जखमींना पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं आहे.