मुंबई : जमीन मोजणीसाठी सहसा काही निश्चित परिमाणं वापरण्यात येतात. एकर हे त्यापैकीच एक आणि त्याखालोखालच जमिनीच्या मोजणीसाठी वापरात येणारं परिमाण म्हणजे, गुंठा किंवा गुंठे.
गावठाणाच्या ठिकाणी तर, जमिनीच्या व्यवहारांमध्ये याच परिमाणात आर्थिक उलाढाल केली जाते. पण, हा शब्द नेमका कुठून आला, त्याची सुरुवात कशी झाली आणि त्यामागची कहाणी काय असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
एका व्हिडीओमुळं यासंबंधीची माहिती समोर आली. जिथं कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अंबा क्षेत्रातील एका ठिकाणावरुन याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आली.
स्थानिक व्यक्ती आणि ट्रेक मार्गदर्शकानं याबाबतची माहिती सांगताना काही रंजक गोष्टींचा उलगडा केला.
असा जन्मला 'गुंठा'
30*33 या मापाची जागा म्हणजे गुंठा. गुंठ्यांमध्ये जमिन मोजली जाण्याआधी जमीन बिग्यांमध्ये मोजली जात होती. 30*33 चं प्रमाण मानणारा जो इंग्रज अधिकारी होता त्याचं नाव होतं 'गुंठेल'.
असं म्हटलं जातं की, गुंठेल या अधिकाऱ्यानंच हे परिमाण काढलं आणि तेच पुढे गुंठा म्हणून प्रचलित झालं.
साधारण 1 हजार चौरस फूटांचं भूक्षेत्र म्हणजे 1 गुंठा असं सध्या गृहित धरलं जातं.
गुंठेल अधिकाऱ्यानं 1842 मध्ये जमीन मोजणीची सुरुवात केली आणि त्या क्षणापासून महाराष्ट्रात गुंठ्यामध्ये जमीन मोजणीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं.
आरशांचा वापर करुन त्यावेळी जमीन मोजणी केली जात असे. यामध्ये सूर्यप्रकाश, आरशाचं प्रतिबिंब यांच्या मदतीनं जिल्ह्यांची हद्द ठरवली गेली.
सह्याद्रीतूनच ही कामं करत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग यांच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या मोजणीला इंग्रजांनी 1842 मध्ये सुरुवात केली. ते करत असताना महाराष्ट्रातील काही उंचवण्याची ठिकाणं शोधली.
काही निवडक ठिकाणांपैकी एक होतं अंबा येथील बावट्याची काठी, झेंडा बुरूज.
इथून पश्चिमेला पाहिल्यास रत्नागिरी हद्दीतील महिमतगड, दक्षिण पश्चिमेला पाहिल्यास क्षितीजावर सिंधुदुर्गचं निशाण दिसतं, पूर्वेला पाहिल्यास सांगली बेंचमार्क दिसतो, रत्नागिरीच्या हद्दीतून उत्तर पूर्वेला पाहिल्यास सातारची खूण दिसते.
कोट्यवधींच्या घरात जमिनीचे व्यवहार केले जातात. पण, जमीन मोजताना सर्रास वापरला जाणारा गुंठा हा शब्द इतक्या रंजक पद्धतीनं जन्मास आला याची माहीतीही तितकीच लक्षवेधी आहे, नाही का?
(वरील माहिती एका व्हिडीओच्या माध्यमातून स्थानिकांनी दिली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)