प्रशांत परदेशी, झी मीडिया,
St Bus Accident News: सुरत महामार्गावरील (Surat Highway) विसरवाडी गावाजवळ एसटी महामंडळाची बस (ST Mahamandal Bus Accident) आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला असून ट्रकमधील ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विसरवाडी आणि नवापूर येथे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. (ST Mahamandal Bus And Truck Accident)
नवापूर - नाशिक ही एसटी बस नवापूरहून प्रवाश्यांना घेऊन नाशिकला जाण्यासाठी निघाली होती. विसरवाडी गावाच्या पुढे महामार्गावर समोरुन येणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक प्रकाश राहणार तामिळनाडू याचा मृत्यू झाला आहे. तर, बसमधील सुमारे १५ प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात बसमधील प्रवासांना तात्काळ उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून, काही गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघात एवढा भीषण होता की बस व ट्रकचा समोरासमोरील भाग हा अपघातामुळे संपूर्ण चक्काचूर झाला. बसमधील बहुतेक प्रवासी नवापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तसेच अपघात पाहण्यासाठी महामार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.
चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस-चंद्रपुर मार्गावर एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागली. यात सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. चंद्रपुर आगाराची ही बस चंद्रपुरहुन घुग्घुस येथे गेली होती. दरम्यान घुग्गुस शहरातील खान ट्रेडर्सजवळ एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागली. या बसमध्ये प्रवासी कमी होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून बसचे मात्र नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी बसची आग विझविण्यासाठी तातडीने हालचाल केली. या घटनेची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथेही आज भीषण अपघात झाला आहे. साकोलीवरून नागपूरकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाला नागपूरवरून साकोलीकडे जात असलेल्या अज्ञात ट्रकने जोरधार धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग 6 वरील शिंगोरी येथे घडली आहे. दरम्यान, चारचाकी वाहन क्र. MH 35 P 6343 हे साकोली वरून नागपूरकडे जात असतांना नागपूर कडून साकोलीकडे जात असलेल्या अज्ञात ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहनाला धडक दिली यात कोणाची मृत्यू झाला नसून कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून ट्रकसह पसार झाला आहे.