काँग्रेसही फुटीच्या मार्गावर, सोनिया गांधींची फोनवरुन चर्चा

राष्ट्रवादीनंतर काँग्रेस ही फुटणार का ?

Updated: Nov 23, 2019, 11:52 AM IST
काँग्रेसही फुटीच्या मार्गावर, सोनिया गांधींची फोनवरुन चर्चा title=

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या बदललेल्या राजकीय परिस्थितीची माहिती घेतली आहे. कालच मुंबईत दाखल झालेल्या के सी वेणूगोपाळ यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा केली. आमदारांची नेमकी काय भावना आहे हे जाणून घ्या असे आदेश त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याने राष्ट्रवादीचा एक गट पक्षातून फुटला आहे. जवळपास २२ आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. त्यापैकी १५ आमदार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे आणखी किती आमदार राष्ट्रवादीतून फुटणार याबाबत अजून काहीही सांगता येणार आहे.

राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडण्याची शक्यता असताना काँग्रेसही फुटीच्या मार्गावर आहे. राज्यात काँग्रेसमध्ये २ गट पाहायला मिळाले होते. मंत्रीपदावरुन देखील काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरु होती. पण आता महाविकासआघाडीचा सरकार स्थापनेचा डाव फसल्याने काँग्रेसमधील काही आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. ३० तारखेपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यामुळे आता बहुमताचा आकडा कसा गाठणार याबाबत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रश्न आहे.