खासदार नवनीत कौर-राणा यांचं भाकीत अखेर खरं ठरलं

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री...

Updated: Nov 23, 2019, 10:40 AM IST
खासदार नवनीत कौर-राणा यांचं भाकीत अखेर खरं ठरलं title=

मुंबई : महाराष्ट्रात सत्तेचा महासंघर्ष सुरु असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल अशी शक्यता जवळपास अनेकांना वाटत होती. पण एका रात्रीत राजकीय भूकंप झाला. सकाळी अचानक राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या खातेवाटपाची चर्चा झाली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे जवळपास निश्चित झालं. पण एका रात्रीत हे स्वप्न भंगलं. भाजपकडून यावर मात्र वेट अँड वॉचची भूमिका होती. अनेक जण देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं म्हणत होतं. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असा विश्वास व्यक्त केला होता. ११ नोव्हेंबला त्यांनी केलेलं हे भाकित आज खरं ठरले. 

राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींचे पडसाद साऱ्या देशातील राजकीय पटलावर उमटत असतानाच नवनीत राणा मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. राज्यातील राजकीय वर्तुळात कितीही हालचाली सुरु असल्या तरीही मुख्यमंत्री भाजपचाच असेल. यामध्ये वेळ दवडला जाऊ शकतो. पण, देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील आणि त्यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापना होईल असं म्हणत फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम असल्याचं लक्षवेधी वक्तव्य त्यांनी केलं होतं.

लोकसभेतही त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना भाजपविरोधात आक्रमक झालेली पहायला मिळाली. ओल्या दुष्काळासाठी केंद्रानं मदत न जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातला होता. त्यावर संसदेत बोलताना मात्र नवनीत राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.

नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून संयुक्त पुरोगामी आघाडीचे पुरस्कृत अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.