सोशल मीडिया तज्ज्ञच निघाला आरोपी, डॉक्टरला घातला कोट्यवधीचा गंडा

सोशल मीडियावर फसवणूक टाळण्याचे लेक्चर द्यायचा, आणि स्वत:च लोकांची फसवणूक करायचा

Updated: Oct 13, 2022, 09:43 PM IST
सोशल मीडिया तज्ज्ञच निघाला आरोपी, डॉक्टरला घातला कोट्यवधीचा गंडा title=

पराग ढोबळे झी, मीडिया, नागपुर : नागपूरात (Nagpur) फसवणुकीचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडिया Influencer म्हणून समाजात वावरत असणाऱ्या व्यक्तीनेच त्याचावर विश्वास ठेवल्याचा गैरफायदा घेत एका नामांकित होमिओपॅथी डॉक्टरला (Homeopathic Doctor) तब्बल साडेचार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. अजित पारसे (Ajit Parse) असं त्या सोशल मीडिया तज्ज्ञाचं नाव असून नागपूरच्या कोतवाली पोलिसांनी (Nagpur Kotwali Police Station) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कोण आहे अजित पारसे?
अजित पारसे हे सोशल मीडियावरच (Social Media) एक प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियातून होणारी फसवणूक कशी टाळता येईल यासाठी अजित पारसेने जनजागृतीचे अनेक कार्यक्रम घेतले. यातून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. सार्वजनिक क्षेत्रात वावरत अनेक राजकीय नेते, समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी ओळख असल्याचे फोटो दाखवत त्याने स्वत:चा दबदबा तयार केला. यातूनच 2019 मध्ये नागपुरमधील महाल परिसरात असणाऱ्या नामांकित डॉक्टरशी त्याची ओळख झाली. समाजातील मोठं व्यक्तीमत्व म्हणून डॉक्टरांनी त्याच्यावर विश्वास ठेवला

डॉक्टराला असं ओढलं जाळ्यात
अजित पारसे आणि त्या डॉक्टरची ओळख वाढली. त्या डॉक्टरने आपल्याला होमिओपॅथचं महाविद्यालय सुरु करायचं असल्याचं अजित पारसेजवल बोलून दाखवलं आणि इथेच डॉक्टर त्याच्या जाळ्यात फसला. अजित पारसेने आपले अनेक राजकीय मंडळींशी निकटचे संबंध असल्याचं डॉक्टला सांगितलं. होमिओपॅथी महाविद्यालय सुरु करण्यासाठी एक कंपनी सुरु करण्याचा सल्ला अजित पारसेने त्या डॉक्टरला दिला.

डॉक्टर त्याच्या भूलथापांना बळी पडत गेला. कंपनी सुरु करण्यासाठी सुरुवातीला त्याने 25 लाख रुपये उकळले. त्यानंतर डॉक्टरची अनेक गुपीतं अजित पारसेला कळली. एका आर्थिक प्रकरणात डॉक्टर हमीदार होता. या प्रकरणात सीबीआयकडून अटक वॉरंट निघाल्याचं अजितने त्यांना सांगितलं. पण सीबीआयमध्ये आपली ओळख असून प्रकरण मिटवण्यासाठी पैसे लागतील असं सांगत अजित पारसेने डॉक्टरकडून तब्बल दीड कोटी रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारण सांगत गेल्या दोन वर्षात त्याने डॉक्टरची तब्बल साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली. 

फसवणूकीचा प्रकार डॉक्टरला कळला
अजित पारसे आपली फसवणूक करुन पैसे उकळत असल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी हिम्मत करत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकरण त्यांना सांगितलं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे हे प्रकरण सोपवलं. यानंतर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत तपास सुरु केला. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पण प्रकृती ठिक नसल्याने अजित पारसे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही.

झाडाझडीत मिळाल्या धक्कादायक साहित्य
चौकशीसाठी क्राइम ब्रांचच्या पथकानं अजित पारसे याच्या घरात झाडाझडती घेतली. यावेळी घरातून अनेक साहित्य जप्त केलय. यात कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर यासह स्टॅम्प पेपर, खोटे दस्ताऐवज, शासकीय कार्यालयाचे शिक्के, पोलीस विभागाचे शिक्के, लेटरहेड राजकीय नेते मंडळींशी असलेले फोटो तसंच नेतेमंडळीची लेटरहेड या गोष्टी सापडल्या. फोटोशॉपच्या साह्यानं फेक कागदपत्रे तयार केल्याचं समोर आलंय. तपासा दरम्यान पीएमओ कार्यालयात ओळख असल्याचं दाखवण्यासाठी डॉक्टरांना बनावट ई-मेल करून फसवणूक करत असल्याचंही तपासात समोर आलंय. 

हनी ट्रॅपचा पोलिसांनाही संशय....
अजित पारसे हा मोठ्या लोकांशी ओळख असल्याचं सांगत अनेकांना दिल्लीच्या आलिशान हॉटेलमध्ये नेत. तिथं त्याना हनी ट्रॅपमध्ये अडकवत खंडणी वसूल केल्याची शंका पोलिसांना आहे. कम्प्युटर लॅपटॉप मधून मिळालेल्या डेटा पाहता पोलिसांचा संशय बळावलाय. त्यामुळं त्याही दृष्टीने तपास सुरू केलाय. अशाच पद्धतीनं आणखी बऱ्याच लोकांची फसवणूक झाली असावी असा कयास लावला जात आहेय.