कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील दुकानं शुक्रवारी सकाळपासून बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केडीएमसी आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यपदार्थ, दुधजन्य दुकानं, मेडिकल, रुग्णालयं, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसी आयुक्तांनी दिले आहेत.
मंगळवार 20 मार्चपासून तेन 31 मार्चपर्यंत दुकानं बंद राहणार आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
तसंच, उल्हासनगर शहरातील कारखाने, इतर दुकानं, व्यापारी पेठा तीन दिवस बंद ठेवण्याचं महापालिका आयुक्तांनी आवाहन केलं आहे. सर्व संबंधित व्यापारी आणि व्यावसायिकांनी गुरुवारी रात्री १२ वाजल्यानंतर, पुढील तीन दिवस दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आज मुंबई आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असल्याने आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७ वर गेली आहे. कल्याणमध्ये आतापर्यंत एकूण 3 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी वाढ पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातही जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. तसंच पनवेलमध्येही दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.