'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू'

श्री वैजनाथ ट्रस्ट विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ

Updated: Nov 27, 2021, 08:38 AM IST
'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू' title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीच्या पत्राने परळीत एकच खळबळ उडालीय.

संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात कडून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलीसांनी तपासाची सूत्र हलवली आहेत. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात. 

सध्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले त्यांनंतर हा सर्व प्रकार समोर आला रतनसिंग रामसिंग दख्खने, रा.काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले आहे.