महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! डॉक्टरने कापून बाहेर काढला गर्भ, मुलगी नको म्हणून महिलेचा गर्भपात

बंदी असतानाही डॉक्टरकडून महिलेचं गर्भलिंगनिदान, अवैध गर्भपात प्रकरणामुळे बीड हादरलं

Updated: Jul 26, 2022, 08:56 PM IST
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! डॉक्टरने कापून बाहेर काढला गर्भ, मुलगी नको म्हणून महिलेचा गर्भपात  title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : दुसरी मुलगी नको म्हणून महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. महिलेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करत डॉक्टरने अक्षरश: गर्भ कापून बाहेर काढला. या भीषण घटनेने बीड जिल्हा हादरला असून याप्रकरणी पती, सासू आणि डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
2020 साली पीडित महिलेचं नारायण अंकुश वाघमोडे याच्याशी लग्न झालं. नारायण परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीला आहे. लग्न झाल्यापासून पती नारायण आणि सासू छाया वाघमोडे यांनी पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली. माहेरच्यांशी बोलण्यासही तिला बंदी घालण्यात आली.

सप्टेंबर 2021 मध्ये पीडित महिलेने मुलीला जन्म दिला. पण यानंतर मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ सुरु झाला. यावर्षी पीडित महिला पुन्हा गर्भवती राहिली.

दुसरी मुलगी नको, मुलगाच हवा
दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या पीडित  महिलेकडून मुलगाच हवा असा हट्ट पती आणि सासूने धरला. सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान करू आणि मुलगी असली तर गर्भपात करायचा असं सासरच्यांनी ठरवलं. पण पीडित महिलेने त्याला नकार दिला. यानंतरही पती आणि सासूने जून महिन्यात गर्भलिंगनिदानासाठी डॉक्टरान सोबत संपर्क साधला. धक्कादायक म्हणजे डॉक्टरनेही याला संमती दिली.

गर्भपात करण्यासाठी डॉक्टरला चक्क सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथून बोलावण्यात आलं. बार्शीतल्या डॉ. स्वामीने सोनोग्राफी मशीन घेऊन वाघमोडे यांच्या घरी येतं पीडित महिलेचं गर्भलिंगनिदान केलं. यात मुलीचं गर्भ असल्याचं निदान झालं. पुन्हा मुलगीच असल्याने वाघमोडे कुटुंबाने पीडित महिलेला गर्भपात करण्यास सांगत तिला मारहाण केली.

विश्वासघाताने टोचलं गर्भपाताचं इंजेक्शन
जुलै महिन्यात पीडित महिला आजारी पडली. तिला ताप, उलट्याचा त्रास होऊ लागला. 15 जुलैला सासू छाया हिचा मेहुणा प्रकाश कावळे हा पुन्हा डॉक्टर घेऊन घरी आला. उपचाऱ्याच्या नावाखाली डॉ. स्वामीने पीडित महिलेला गर्भापाताचं इंजेक्शन टोचलं. घडलेला सर्व प्रकार पीडित महिलेने पुण्यात राहणाऱ्या आपल्या भावाला सांगितला.

जबरदस्तीने गर्भपात, तुकडे करून गर्भ काढला बाहेर
16 जुलै रोजी पहाटे 1.30 वाजता डॉ. स्वामी पुन्हा वाघमोडे यांच्या घरी आला. त्याने पीडित महिलेची तपासणी केली. पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल असं त्याने सांगितलं. पण मला गर्भपात करायचा नाही अशी विनवणी पीडित महिलेने डॉक्टरकडे केली. पण डॉक्टर आणि सासऱ्यांच्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत महिलेचा जबरदस्थीने गर्भपात केला. 

सासाने तिचे हात पकडले आणि डॉ. स्वामीने अक्षरश: गर्भ कापून तुकडे बाहेर काढले. त्यानंतर पीडित महिलेचा पतीस सासू आणि प्रकाश कावळे यांनी त्या गर्भाची विल्हेवाट लावली. तसंच झालेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 

चौघांवर गुन्हा दाखल
16 जुलैला सकाळी पीडित महिलेचा भावाने सासरच्यांना विनंती करुन तिला माहेरी आणलं. अखेर हिम्मत करुन पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या फिर्यादीवरुन पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रकाश कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.