औरंगाबाद : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद वाक्य असणारी MSRTC एसटी आपल्या सर्वांना वेळेवर हव्या त्या ठिकाणी पोहोचवण्यास मदत करते. मात्र, याच एसटी संदर्भात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
एसटी म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांची जीवनदायिनी... मात्र चालकाचा बेजबाबदारपणा या जीवनदायिनीत प्रवास करणा-या प्रवाशांच्या जीवावर उठलाय. हा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडलाय. प्रवाशांनी भरलेली एसटी सुरु आहे आणि चालक महाशय चक्क ड्रायव्हिंग करताना मोबाईल पाहण्यात व्यस्त आहेत.
पैठण-जालना बसमधील हा व्हिडीओ आहे. बसमधल्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हा चालक चक्क फेसबुक आणि व्हॉट्सअप चेक करतोय. या बेजबाबदार चालकाची नजर कधी समोर तर कधी मोबाईलमध्ये असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
सुदैवानं या बसचा अपघात झाला नाही. मात्र, बसमधल्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हा बेजबाबदार चालक आपल्या मोबाईलशी खेळतोय.
या चालकाचं नाव कळू शकलेलं नाहीये. मात्र, प्रवाशांच्या जीवाशी खेळणा-या अशा बेजबाबदार एसटी चालकावर महामंडळानं कारवाई करणं गरजेचं आहे.