Uddhav Thackeray : (Mumbai BMC) मुंबई महापालिकेमध्ये शिंदे गटाच्या गोंधळानंतर शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाला पालिका आयुक्तांनी तूर्तास दणका दिल्यानंतर याचे पडसाद थेट नागपुरात उमटले. (winter session) हिवाळी अधिवेशनादरम्यानच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या. यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे कानही टोचले. आपल्या वक्तव्यांतून त्यांनी आरएसएसला (RSS) इशारा देत सतर्कही केलं.
विदर्भासाठी या सरकारनं काय दिलं? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी आपला रोख पालिकेत झालेल्या गोंधळाकडे वळवला. 'काल मुंबई महापालिकेत मिंधे गट (शिंदे गट) गेला होता, आज तो आरएसएस कार्यालयात गेला. ते आरएसएस कार्यालयात काय ताबा सांगायला गेले होते का? याचं उत्तर मात्र अद्यापही मिळू शकलेलं नाही. ज्यांच्यात स्वत:मध्ये काही निर्माण करण्याची ताकद नसते ते उघडपणे चोऱ्यमाऱ्या करतात, ताबा घेतात', असं म्हणत त्यांनी या साऱ्याबद्दल मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायची गरज असल्याचा टोला लगावला.
काहीजणांच्या मनात आपण काहीच करत नाही आहोत याचा न्यूनगंड असतो, आपल्या कुवतीची जाणीव असते, ज्यानंतर ते इतर मार्गांचा अवलंब करतात असं म्हणत शिंदे गटाचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टिका केली. आरएसएस कार्यालयातून 'ते' बाहेर पडले असतील तरीही मोहन भागवत यांना सूचित करत तिथं लिंब टाचणी कुठे कोपऱ्यांमध्ये पडली तर नाहीये ते तपासून पाहा असा उपरोधिक टोला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात स्मृती मंदिर परिसरात भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. अभिवादनानंतर संघाच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चाही केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पण, ठाकरे गटानं मात्र या भेटीवरही तोफ डागल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
सत्ताधाऱ्यांवर निशाणा...
हिवाळी अधिवेशनाने महाराष्ट्राच्या जनतेला दिलं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. अधिवेशन काळात रोज मंत्र्यांच्या घोटाळ्यांविषयी चर्चा झाल्या, यावेळी मात्र मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील असं मात्र वाटत नाही असा सूर आळवत त्यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. एकूण घोटाळ्यांबाबत अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्याबाबत सरकार काय निर्णय करणार? आरोप झालेत त्यांना क्लीनचीट देणार, आरोप केले त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करणार हीच सध्याच्या सरकारची भूमिका दिसत आहे, असं म्हणत त्यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला.