नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची उचलबांगडी

'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात आल्यानंतर राजापूरमध्ये नाणार प्रकल्पांच्या समर्थकांची एक बैठकही पार पडली होती. 

Bollywood Life | Updated: Feb 19, 2020, 05:42 PM IST
नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची उचलबांगडी title=

सिंधुदुर्ग: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्यानंतर लगेचच नाणार प्रकल्पाची तळी उचलून धरणे शिवसेना पदाधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. शिवसेनेकडून या पदाधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली. 

'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात आल्यानंतर राजापूरमध्ये नाणार प्रकल्पांच्या समर्थकांची एक बैठकही पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर हजर होते. यानंतर सागवे येथील शिवसेनेचे विभागप्रमुख राजा काजवे यांच्यासह काही शिवसैनिक नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचे सांगत या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती. प्रकल्प पूर्ण करण्याची हीच ती वेळ असे फलकदेखील शिवसैनिकांच्या हातात होते. नाणार प्रकल्पाचे फायदे लक्षात आल्याने आम्ही त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचे या शिवसैनिकांचे म्हणणे होते. काही सेवाभावी संस्थांनी स्थानिक शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आधी आमचा प्रकल्पाला विरोध होता. मात्र आता आम्ही या प्रकल्पाचे समर्थन करत असल्याचे सांगत शिवसैनिकांनी नाणार प्रकल्पाची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे शिवसेनेच्या नाणार प्रकल्पविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. 

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारचा विषय आमच्यासाठी केव्हाच संपला, असे सांगत शिवसेना नाणारविरोधी भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर शिवसेनेने नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे राजा काजवे यांची विभागप्रमुख पदावरून हकालपट्टी झाली. त्यांच्याजागी कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काजवे यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकारी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबद्दलचा अहवाल पक्षाकडून मागवण्यात आला आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.