पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी

शिवसेनेची भाजपच्या खासदाराला उमेदवारी

Updated: Mar 25, 2019, 02:30 PM IST
पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी title=

पालघर : पालघरचे विद्यमान भाजप खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वणगा यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. पोटनिवडणुकीत भाजपने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने काँग्रेसमध्ये असलेल्या राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये घेऊन पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं होतं. गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वणगा यांचा पराभव केला होता. 

शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. शिवसेनेने भाजपच्या खासदारालाच उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेला तगडे उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे. साता-यात भाजपच्या नरेंद्र पाटलांना तर पालघरमध्ये भाजप खासदार राजेंद्र गावित यांना पक्षात घेवून तिकीट दिलं जात असल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.