रत्नागिरी : शिवसेना कोणत्याही परिस्थितीत 'नाणार' प्रकल्प होऊ देणार नाही, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये... मुख्यमंत्री 'फितूर' झाले असल्याचा उल्लेख ठाकरे यांनी याबाबत काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात केलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही अखेर पिचक्या पाठकण्याचेच निघाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुखांनी केलीये. 'नाणार' प्रकल्प लादणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतानाही हा प्रकल्प लादला गेला. तरी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय.... मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत नसल्याचा टोलाही शिवसेना पक्षप्रमुखांनी लगावलाय.
नाणारसारखा विनाशकारी प्रकल्पन लादणार नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कदापि कोकणच्या भूमीत येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही हा प्रकल्प लादला गेला. हा विश्वासघात असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दास दिल्लीत किंमत नाही, असं म्हणत सेनेनं मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधलाय.
दरम्यान, सौदी अर्माको कंपनीबरोबर दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा दीड लाख कोटींचा करार हा नाणार प्रकल्पाशी संबंधीत आहे. प्राप्त माहितीनुसार नाणार प्रकल्पात सौदी अर्माको कंपनीची 50 टक्के भागीदारी आहे. IOC , HPCL, BPCL या कंपन्यांचीही नानार मध्ये 50 टक्के गुंतवणूक असल्याची माहिती आहे. सौदी अर्माको ही जगातील सर्वातमोठी तेल उत्पादक कंपनी आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता , केंद्र सरकारने नानार प्रकल्प रेटला, अशी चर्चा या करारानंतर राजकीय वर्तुळात रंगली असतानाच शिवसेनेने मात्र आपल्याला या कराराबाबत अद्याप माहिती नसल्याचे म्हटले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने सौदी अर्माको सोबत केलेला करार आणि शिवसेनेच्या विरोधाचे पुढे काय होणार याबाबत झी मीडियाने शिवसेनेच्या दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधला असता आम्हाला या कराराबाबत अद्याप माहिती नसल्याचे सांगण्यात आले.