कणकवलीत राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला, सेना-भाजप युतीला धक्का

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. येथील राजकीय गणित नक्की काय आहे, ते पाहा.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2018, 01:51 PM IST
कणकवलीत राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला, सेना-भाजप युतीला धक्का title=

सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. दहा जागांवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा विजय झालाय. शिवसेनेचे नाक कापल्याची तिखट प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठा विजय मिळालाय नगराध्यक्षपदी राणेंच्या पक्षाचे समीर नलावडे निवडून आले आहेत. मात्र, राणे यांनी शिवसेना - भाजप युतीला दे धक्का दिलाय. राणे यांनी हे कसं काय टायमिंग साधलं, याची चर्चा आहे. राणे यांना जोरदार धक्का देण्यासाठी विरोधक एकत्र आले होते. मात्र राणे यांच्या विजयामागे 'साहेबां'चा हात असल्याचे सांगितले जात आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राणेंना कोणी बळ दिलेय?

नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं १७ पैकी १० जागांवर विजय मिळवलाय. तर भाजपला ३ आणि शिवसेनेचा उमेदवार ३  जागेवर विजयी झालाय. तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आलाय. त्यामुळे राणेंचा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी यांची आघाडी असल्यानं नगरपंचायतीत १७ पैकी ११ सदस्य सत्ताधारी गटाचे असणार आहेत. राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करुन सत्ता आपल्याकडे खेचून आणली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपला तसेच काँग्रेसला शह देण्यासाठी खेळी केल्याची चर्चा आहे.

नगरपंचायतीमधील पक्षीय बलाबल

- स्वाभिमान १०
- राष्ट्रवादी १
- शिवसेना ३
- भाजप ३

राणेंची पहिली प्रतिक्रिया

कोकणात जिथे स्वाभिमान तिथे यश असेल. कोकणात विकास पाहायचा असेल तर स्वाभिमानशिवाय पर्याय नाही. मुख्यत्वे आमदार नितेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे अक्षरश: शिवसेना आणि तिथले त्यांचे साथीदार भाजपचं नाक कापलं गेलंय, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री नारायण रामे यांनी दिली.