मोदी-मेलोनी Memes वरुन ठाकरे गटाचा संताप; म्हणाले, 'यावरुन देशातील...'

Uddhav Thackeray Group On Modi Meloni Memes: जी-7 शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदी सध्या इटलीमध्ये असून नुकताच त्यांच्याबरोबरच एका छोटा व्हिडीओ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 17, 2024, 01:34 PM IST
मोदी-मेलोनी Memes वरुन ठाकरे गटाचा संताप; म्हणाले, 'यावरुन देशातील...' title=
उघडपणे व्यक्त केली नाराजी

Uddhav Thackeray Group On Modi Meloni Memes: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिम्सवरुन संताप व्यक्त केला आहे. या दोन्ही नेत्यांवरील मिम्स अत्यंत लाजिरवाणे आहेत, असं उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. या मिम्समधून तसेच यासंदर्भातील विनोदांमधून देशातील विनोदाचा दर्जा किती वाईट आहे, हे लक्षात येतं अशी टीकाही राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या ठाकरे गटाच्या सदस्याने केली आहे.

सोशल मीडियावर 'मेलोडी'ची चर्चा

जी-7 शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदी सध्या इटलीमध्ये आहेत. या ठिकाणी इतर अन्य देशांचे प्रतिनिधीही उपस्थित आहेत. सोशल मीडियावर मोदींच्या या भेटीतील अनेक फोटोही व्हायरल झाले. पण, सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या फोटोंनी. या दोघांची नुकतीच भेट झाल्याने त्यांच्यासंदर्भातील मिम्स पुन्हा चर्चेत आले आहेत. या दोघांच्या नावातील काही अक्षरं एकत्र करुन मेलोडी म्हणजेच #Melodi हा हॅशटॅग समर्थक वापरतात. स्वत: मेलोनी यांनीही मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हा हॅशटॅग वापरुन मोदींबरोबरचा दुबईतील सीओपी28 परिषदेत सहभागी झाल्यानंतरचा सेल्फी पोस्ट केला होता. मात्र आता हे दोघे पुन्हा भेटल्याने त्यांचे मिम्स व्हायरल झालेत.

नवे मिम्स व्हायरल

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मोदी आणि मेलोनी यांच्या मिम्समध्ये कधी दोघांत फोन कॉल झाल्याचा संदर्भ दिला जातो. तर कधी या दोघांचे फोटो वापरुन नुकत्याच झालेल्या निवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये काय संवाद झाला असेल याबद्दलचे रंजक मिम्स कल्पनाशक्ती वापरुन तयार केले जात आहेत. मात्र यापैकी काही मिम्स हे पातळी सोडून असल्याबद्दल ठाकरे गटाच्या प्रवक्त्या तसेच राज्यसभा खासदार असलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावरुन व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या?

मोदी आणि मेलोनी यांचे मिम्स म्हणजे 'जरा अती होतंय' असं झाल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. "इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिम्सने हद्द पार केली आहे. हे मिम्स फारच लाजिरवाणे आहेत. यावरुन देशातील विनोदाचा स्तर किती खालावला आहे हे दिसून येत आहे. केवळ मला वाटलं ते बोलले," असं चतुर्वेदी यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केलं आहे.

चतुर्वेदी यांना या पोस्टवरुन काही समर्थकांनी उद्धव ठाकरेंवर मिम्स केल्यानंतर शिवसैनिकांनी एका व्यक्तीचं मुंडन केले होतं अशी आठवण करुन दिली आहे.