प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोकणात राजकीय राडे अनेक वेळा पाहिलेत. त्यातही शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय कलगीतूर नेहमीच रंगलेला असतो. पण आज कोकणातील राजकारणात एक वेगळं चित्र पहायला मिळालं.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या 'वेंगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठ' लोकार्पणाच्या निमित्ताने आज शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर, तसंच भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते मात्र यावेळी चित्र वेगळं होतं. भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चक्क एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली.
भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत हे चक्क कानात हितगुज करताना पहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहिर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केलं. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल, या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की रंगेल. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी दिले आहेत.
नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहिर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचं बोलून दाखवलं. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवली
कोकणात शिवसेना आणि भाजप नेते एकत्र येणं हे वेगळ्या राजकारणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.