कुणाल जमदाडे, झी मिडिया, अहमदनगर : राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.. त्यातच भाजप राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेच्या जागेवर देखील भाजपचा डोळा असल्याचं समोर आलंय.भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत बैठक घेत ही जागा भाजपलाच मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे केवळ मोदींच्या लोकप्रियतेमुळे दोनदा निवडून आलेत.ही जागा भाजपला मिळाल्यास इथे शंभर टक्के भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांचा आहे.
विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे केवळ नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात दोनदा निवडून आले. शिर्डी लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असून ही जागा भाजपला मिळाल्यास इथे शंभर टक्के भाजपचा खासदार होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विकास झाला मात्र स्थानिक खासदारांकडून अपेक्षित विकासकामे झाली नाहीत.आम्ही दोन वेळेला मोठ्या मताधिक्याने खा. सदाशिव लोखंडे यांना निवडून दिले मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही करायचे नाही अशा शब्दात भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाजपचे खासदार असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात विकास झालाय. या मतदारसंघात भाजपचा खासदार झाला तर शिर्डीसह जिल्ह्याचा विकास होईल... इथल्या जनतेची आणि भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने पक्षाने ही जागा भाजपकडे घ्यावी असं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटल आहे.
याबाबत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील शिर्डी लोकसभेच्या जागेबाबत सूचक वक्तव्य केलंय.जी कार्यकर्त्यांची भावना आहे तीच माझी भावना असल्याच वक्तव्य केले. शिर्डी लोकसभेच्या जागेबाबत महाविकास आघडीबरोबरच महायुतीत देखील रस्सीखेच सुरू असल्याचं स्पष्ट होत असून शिर्डीची जागा ही कोणाला मिळणार हे येणाऱ्या आगामी काळात स्पष्ट होईल.