Sharad Pawar : पुतण्याच्या बंडानंतर काकांची पहिली चाल; शरद पवार Action Mode मध्ये

Sharad Pawar : रविवारी संपूर्ण राज्यातीस नागरिक आठवडी सुट्टीचा आनंद घेत असताना तिथं राज्याच्या राजकीय पटलावर मात्र एक बंडखोर खेळी खेळी गेली. ज्यामुळं राष्ट्रवादीत फूट पडली.   

सायली पाटील | Updated: Jul 3, 2023, 08:26 AM IST
Sharad Pawar : पुतण्याच्या बंडानंतर काकांची पहिली चाल; शरद पवार Action Mode मध्ये  title=
(छाया सौजन्य- पीटीआय) Sharad Pawar to visit karad satara post ajit pawar rebel latest updates

Sharad Pawar : राष्ट्रवादीत कालपरवापर्यंत सर्वकाही आलबेल असल्याचं ठणकावून सांगणारी नेतेमंडळीच आता पक्षाकडे पाठ फिरवून सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करताना दिसत आहेत. पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा बंड करत अजित पवार यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आणि आता दुपारच्या शपथविधीमध्ये रविवारी त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य करत तशी कृतीही केलेली असताना अजित पवार यांनी 8 आमदारांसह पक्षांतर्गत बंड केलं. पण, शेवटी चार पावसाळे पवारांनीच जास्त पाहिले असं म्हणावं लागेल, कारण आता पुतण्याच्या बंडानंतर काका पहिलीच चाल खेळताना दिसणार आहेत. 

रविवारच्या बंडानंतर सोमवारचा दिवस राष्ट्रवादीसाठी आणि राष्ट्रवादीच्या प्रमुखपदी असणाऱ्या शरद पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांसाठी नव्या आशा पल्लवित करणारा आहे. सोमवारी (आज) शरद पवार सातारा दौऱ्यावर जात असून, तिथून ते या लढ्याचं नेतृत्त्वं करताना दिसणार आहेत. खुद्द पवारांनीच रविवारच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. 

हेसुद्धा वाचा : राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

 

साताऱ्यातील कराड येथे शरद पवार त्यांच्या दौऱ्यादरम्यान, यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन तिथूनच एका नव्या राजकीय लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत.  हजारो कार्यकर्त्यांच्या हजेरीत कराडमध्ये पवारांचं शक्तिप्रदर्शन होईल असंही सांगण्यात आलं असल्यामुळं आता राजकीय वर्तुळाची नजर त्यांच्या या दौऱ्याकडे असेल. 

कसा असेल शरद पवार यांचा सातारा दौरा? 

- सकाळी 8 वाजता पुण्याहून निघणार 

- 11 वाजता कराडमध्ये पोहोचणार 

- 11 ते 11.30 दरम्यान, यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावर दर्शन 

- 11.15 वाजता कराडहून निघणार 

- दुपारी 12 ते 1 दरम्यान रयत शिक्षण संस्थेची बैठक 

- 1 ते 1.45 दरम्यान विश्रांती 

- दुपारी 2 वाजता  पश्चिम महाराष्ट्र मातंग परिषदेला हजेरी 

- साधारण 3.30 वाजता साताऱ्याहून परतीचा प्रवास 

- रात्रौ 8 .30 दरम्यान मुंबईत आगमन. 

पवारांचा आक्रमक पवित्रा 

दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं आता पाहायला मिळत असून, राज्यासह देशाचं राजकारण कोळून प्यायलेल्या शरद पवार आता टप्प्यापट्ट्यानं हे बंड उलथून पाडण्याची रणनिती आखतीलय इतकंच नव्हे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह 9 मंत्र्यांवर कारवाईचा इशाराही पवारांनी दिला आहे. आपण न्यायालयीन लढा लढणार नाही, तर राज्यातील जनतेसमोर जाणार असं पवारांनी स्पष्ट करत जनतेलाही त्यांनी महत्त्वाचा संदेश आणि बंडखोरांना इशाराच दिला आहे. इतकंच नव्हे तर महाविकास आघाडी म्हणून यापुढं आक्रमकपणे काम करणार, असंही पवारांनी सांगितलं.