कोकणाला केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे- शरद पवार

चक्रीवादळात कोकणातील नारळ आणि सुपारीची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. नारळाची बाग उद्ध्वस्त झाली तर पीक येण्यासाठी १० वर्ष लागतात. 

Updated: Jun 9, 2020, 05:50 PM IST
कोकणाला केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे- शरद पवार title=

दीपक भातुसे,झी मीडिया, रत्नागिरी: निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे धोरण ठरवून मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते सध्या कोकण दौऱ्यावर असून ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, राज्यात यापूर्वी अशी संकटे आली आहेत. कोकणातही अशाप्रकारचे संकट आले होते. मला जांभूळपाडा येथील आपत्ती आठवते. त्यावेळी राज्य आणि केंद्र सरकारने मदत देऊन तिथली गावे उभी केली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीही तिथे आले होते. यानंतर २००५ साली नागोठण्यात झालेल्या अतिवृष्टीनंतरही मी कोकणाला भेट दिल्याचे पवार यांनी सांगितले. 

यावेळच्या चक्रीवादळात कोकणातील नारळ आणि सुपारीची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. नारळाची बाग उद्ध्वस्त झाली तर पीक येण्यासाठी १० वर्ष लागतात. त्यामुळे हे दीर्घकालीन नुकसान ध्यानात घेतले पाहिजे. यापूर्वी राज्यात जालना, औरंगाबाद परिसरात मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही चार ते पाच दिवसांत केंद्र सरकारकडून मोसंबी बागायतदारांना प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली होती. त्यामुळे आताही कोकणासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे धोरण ठरवून मदत केली पाहिजे, असा पर्याय शरद पवार यांनी सुचवला. 

याशिवाय, कोकणातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची गरज असल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले. चक्रीवादळात वीज खात्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यासाठी आजुबाजूच्या चार ते पाच जिल्ह्यातील मनुष्यबळ कोकणात वळवून येथील वीजपुरवठा सुरळीत करायला हवा. या कामात मुंबईतील वीज कंपन्यांची मदत घेता येईल का, हेदेखील पाहायला हवे. तसेच यापूर्वी लोकांना दिलेले अन्नधान्य भिजलं असेल तर त्यांना परत धान्य द्यायला पाहिजे. यासाठी आपण अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क केला होता. ते लवकरच यासंदर्भात निर्णय जाहीर करतील, असे शरद पवारांनी सांगितले.