शरद पवारांना निर्णय अमान्य, सिल्व्हर ओकमधून आमदारांना फोन

शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची खात्रीदायक माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.

Updated: Nov 23, 2019, 09:11 AM IST
शरद पवारांना निर्णय अमान्य, सिल्व्हर ओकमधून आमदारांना फोन  title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घटना घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाकडे ११९ आमदारांचं पाठबळ होत. त्यांना आणखी २६ आमदारांची गरज होती. त्यात राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते अजित पवार भाजपासोबत गेले आहेत. त्यामुळे याला राष्ट्रवादीची फूस आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची खात्रीदायक माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.त्यामुळे शरद पवार हे सर्व आमदारांना फोन करत आहेत.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.  कोणते आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत याची चाचपणी केली जात आहे. अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेस-शिवसेनेच्या नेत्यांना धक्का मानला जात आहे.  

राज्यात राष्ट्रपती शासन आले. एक खिचडी होण्याचा प्रकार सुरु होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आम्हाला समर्थन दिले. अन्य काही नेत्यांनीही आम्हाला पाठींबा दिला. राज्यपाल आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र देतील आम्ही बहुमत सिद्ध करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रासमोर जी आव्हाने आहेत त्याचा सामना आम्ही समर्थपणे करु, शेतकऱ्यांच्यामागे खंबीरपण उभे राहण्याचे काम आम्ही करु. खरं वचन आम्ही जनतेला दिले होते. पण या वचनाचा भंग झाला आणि आमच्याऐवजी दुसऱ्यांसोबत जाण्याचा प्रकार झाला असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. 

चर्चेला कंटाळून भाजपा पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. २४ तारखेला निकाल आल्यानंतर कोणीही सरकार बनवू शकले नाही. गेली १ महिना केवळ चर्चाच सुरु होती. यातून कोणताही मार्ग निघत नव्हता. चर्चांमध्ये केवळ मागण्या वाढत होत्या. 

कोणीतरी दोघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हे स्पष्ट होत म्हणून या पद्धतीचा निर्णय आम्ही घेतल्याचे अजित पवार म्हणाले.