Sharad Pawar And Ajit Pawar Group : राष्ट्रवादीतून अजित पवारांनी बाहेर पडत भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. मात्र, हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या एका वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलेय. काळाच्या ओघात याची उत्तरं मिळतील असं सूचक विधान अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी केले आहे. याआधीही अजित पवार गटाने मुंबईत शरद पवारांची दोनदा भेट घेतली होती. तेव्हाही अशाच चर्चांना उधाण आलं होतं
राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडले अशी घडामोडी सातत्याने घडत आहेत. कारण, अजित पवारांच्या नेतृत्वात बंडाचं निशाण फडकवणा-या मंत्र्यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर बंडखोर आमदारांना सोबत घेऊन अजित पवार पुन्हा एकदा सिनिअर पवारांच्या भेटीला गेले होते. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये तब्बल 45 मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली. झाल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त करतानाच, राष्ट्रवादी एकसंध ठेवण्यासाठी आशीर्वाद द्या, अशी विनंती अजित पवार गटानं केल्याचं समजले.
भेटीगाठींचा हा सिलसिला म्हणजे शरद पवारांची मनधरणी आहे की, अजित पवारांची रणनीती? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मनधरणी की रणनीती? असा प्रश्न देखील उपस्थित झाला होता. केवळ मंत्र्यांना सोबत नेल्यानं अजित पवार समर्थक आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. विधान भवनात झालेल्या बैठकीत आमदारांनी नाराजीचा सूर लावला. आम्हाला विश्वासात न घेता फक्त मंत्र्यांनाच घेऊन भेट का घेतली? असा सवाल आमदारांनी अजित पवारांना केला होता. मंत्र्यांना सहानुभूती मिळेल, मात्र आमदारांना मतदारसंघात रोषाला सामोरे जावं लागतं, अशी व्यथा आमदारांनी मांडली. त्यामुळंच अजित पवार आणि प्रफुल पटेल सर्व आमदारांना घेऊन सोमवारी पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला पोहचले होते.
आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही. यापुढंही पुरोगामी भूमिका घेऊनच पुढं जायचं आहे, असं मत पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतलाय, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केलं होतं. मात्र पवारांनी अधिकृतपणे कोणतीही भूमिका मांडली नसल्यानं राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत संभ्रमाचं वातावरण आहे.