खरीप हंगामातील पिकांच्या बियाण्यांचे दर

यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजनं बियाण्यांच्या किमती नुकत्याच जाहीर केल्या. या किमती शेतकऱ्यांसाठी कही खुशी, कही गम अशाच आहेत.

Updated: May 30, 2018, 01:03 PM IST
खरीप हंगामातील पिकांच्या बियाण्यांचे दर title=

जयेश जगड, झी मीडिया,अकोला: यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजनं विविध बियाण्यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. महाबीज बियाण्यांत सर्वाधिक मागणी असते ती सोयाबीनच्या बियाण्याला. मात्र, यंदा सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांना जरा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. तर उडीद, तिळ, मका, आणि तुरीच्या बियाण्यांची किंमती घसरल्या आहेत. प्रत्येक हंगामात राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वस्त आणि रास्त दरात बियाणे उपलब्ध करण्याचा प्रयत्न  'राज्य बियाणे महामंडळ' अर्थातच 'महाबीज'कडून केला जातो. यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजनं बियाण्यांच्या किमती नुकत्याच जाहीर केल्या. या किमती शेतकऱ्यांसाठी कही खुशी, कही गम अशाच आहेत.

सोयाबीन बियाणे प्रती क्विंटल पाचशे रूपयांनी महाग

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे प्रती क्विंटल पाचशे रूपयांनी महाग झालं आहे. मागच्या वर्षी सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल ५७०० रूपये एव्हढा होता. मात्र, यावर्षी हाच भाव ६२०० रूपये प्रतिक्विंटल इतका झाला आहे. उडीद, तीळ, मका, आणि तुरीच्या बियाण्यांची किंमत यावर्षी घटली आहे. तर ज्वारी बियाण्याची किंमत मात्र जैसे थे आहे. महाबीज बियाण्यांच्या किंमतीवर सर्वाधिक प्रभाव असतो तो कृषी  उत्पन्न बाजार समितीतील भावाच्या चढ-उताराचा... यावर्षीच्या भावावर हा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी 'महाबीज'नं  तब्बल ५ लाख ९७ हजार क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलंय. त्यामध्ये सर्वाधिक ४.३० लाख क्विंटलचा वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा असणार आहे. 

'महाबीज' बियाण्यांची दरवाढ : (किंमत प्रति क्विंटल)

यंदा महाबीजच्या सोयाबीन बियाण्यासाठी प्रती क्विंटल ६२०० रुपये मोजावे लागणार आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाण्याच्या किमतीत ५०० रूपयांनी दर वाढ झाली आहे. तूर  बियाणं प्रती क्विंटल  १२,७०० रुपये दरानं उपलब्ध होणार असून त्यामध्ये २३०० रूपयांची घट झाली आहे. उडीद  १०५०० रुपये प्रती क्विंटलने मिळणार असून, त्यामध्ये ५२०० रूपयांची घट झाली आहे. मूग १४००० रुपये प्रति क्विंटल असून, मूगाच्या दरात ४००० रूपांची  घट झाली आहे. तीळ बियाणे प्रती क्विंटल १८००० रुपयांनी उपलब्ध करण्यात आलं असून त्यामध्ये    ३००० रूपयांची घट झाली आहे.