पंतप्रधानांच्या धुळे दौऱ्यात सुरक्षेच्या गंभीर त्रुटी, व्हिडिओमुळे खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी वेगवेगळ्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी धुळ्यामध्ये आले होते.

Updated: Feb 17, 2019, 09:45 PM IST
पंतप्रधानांच्या धुळे दौऱ्यात सुरक्षेच्या गंभीर त्रुटी, व्हिडिओमुळे खळबळ title=

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी वेगवेगळ्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी धुळ्यामध्ये आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. पण मोदींच्या या धुळे दौऱ्यात सुरक्षेच्या गंभीर त्रुटी राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या दौऱ्यात धुळ्याला जाण्यासाठी पंतप्रधान जळगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने गेले. याच दरम्यान कोणीतरी त्यांचे चोरून चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघत आहेत. ८०० च्यावर पोलीस, कमांडो, अधिकारी तैनात असताना सुरक्षा यंत्रणेचे कसे धिंडवडे उडविले जातात, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

एकीकडे जळगावच्या विमानतळ परिसरात सर्वत्र पोलिसांचा मोठा ताफा होता. कडक सुरक्षा यंत्रणा होती. प्रिंट तसंच इलेक्ट्रॉनिक मीडियाला देखील विमानतळाच्या  मुख्यप्रवेशद्वाराजवळ अडवून ठेवलं होतं. अशा पस्थितीत कुणीतरी अगदी जवळून शूटिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विमानतळाच्या संरक्षण भिंतीला असलेल्या एका मोठ्या छिद्रातून शूटिंग करण्यात आलं आहे. पाच ते सहा लोक या ठिकाणी शूटिंग करत होते. शिवाय त्यांच्या चर्चेवरून राजकारणाचे बर्‍यापैकी ज्ञान असल्याचे समोर येत आहे.

हे शूटिंग अगदी समोरच्या बाजूने करण्यात आलेले आहे हे सिद्ध होते. हा व्हिडिओ कोणी केलेला आहे, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, अशा प्रकारची जर सुरक्षा यंत्रणा असेल तर काहीही घडू शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

पुलवामाच्या घटनेनंतर देशात सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली. मात्र, ज्या ठिकाणी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या आणि अतिउच्च पदावर असलेल्या व्यक्ती आहेत, तिकडेच सुरक्षेचा गोंधळ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे जळगावच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.