'बोलतो ते खरं होतं, युती होणार'; चंद्रकांतदादांना विश्वास

मी सातत्यानं जे सांगत असतो, ते खरं होत असतं.

Updated: Feb 17, 2019, 09:29 PM IST
'बोलतो ते खरं होतं, युती होणार'; चंद्रकांतदादांना विश्वास title=

सांगली : मी सातत्यानं जे सांगत असतो, ते खरं होत असतं. त्यामुळे भाजप-शिवसेनेची युती होईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपच्या युतीसंदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना २५-२३ च्या फॉर्म्युलानं लढतील. म्हणजेच २५ जागांवर भाजप, तर २३ जागांवर शिवसेना रिंगणात उतरेल. विधानसभेसाठी मात्र १४४-१४४ जागांचे सूत्र तयार करण्यात आलं आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

...त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार

संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यायला १० वर्ष लागली आहेत. मराठा मोर्चा आणि भीमा कोरेगाववेळी टाकण्यात आलेले गुन्हे सरकारनं मागे घेतले आहेतच, पण गुन्हे मागे घेण्याची मोठी प्रक्रिया असते. ते समजून घ्यावे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

निवडणुका जवळ आल्या की गैरसमज पसरवले जातात, पण वस्तूस्थिती तशी नाही. मराठा मोर्चावेळी दाखल करण्यात आलेले १०० टक्के गुन्हे काढले जाणार आहेत. सांगली-मिरजमध्ये २००७ आणि २००९ दंगलीवेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे आत्ता मागे घेतले जात आहेत. संभाजी भिडेंवर असलेले २००७ सालचे गुन्हे आत्ता मागे घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मराठा समाजावर घालण्यात आलेले गुन्हे मागे घेतले नाहीत, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला मत देणार नाही. गुन्हे मागे घेतले तरच भाजपला मत देऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं भाजप सरकारला दिला होता. 

गुन्हे मागे घेतले तरच मतदान, मराठा समाजाचा भाजपला इशारा