शाळेची घंटा वाजली! राज्यात आजपासून किलबिलाट

Maharashtra schools News : राज्यात आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेची पहिली घंटा आज वाजली.  

Updated: Jun 15, 2022, 09:27 AM IST
शाळेची घंटा वाजली! राज्यात आजपासून किलबिलाट title=

मुंबई : Maharashtra schools News : राज्यात आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेची पहिली घंटा आज वाजली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. कोरोनाच्या काळात शाळा ऑनलाईन सुरु होत्या. त्यामुळे आता प्रत्यक्ष शाळा वर्ग भरल्याने उत्साहाचे वातावरण शाळेत दिसून आले. 

शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं, असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले होते. त्यानुसार आज उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजली आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरु झाल्यात. सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात अशा शाळा सुरु होत आहेत. सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले.

 आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या पहिली ते दहावीच्या शाळा सुरू झाल्यात. मुंबईतल्या परळ भागातल्या आर एम भट शाळेत विद्यार्थ्यांचं खास स्वागत करण्यात आलं. पुण्यातील शाळेत विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं.राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये पर्यावरणाचा जागर म्हणून विद्यार्थ्यांना वृक्षांची रोपं देऊन स्वागत करण्यात आलं तसंच कॅटबरी, गुलाबपुष्प आणि कार्टून ,विदूषक स्वागतासाठी सज्ज होता.

पाठ्यपुस्तकांचा तुटवडा, 'मुलांना शाळेत पाठवून फायदा काय?'

दरम्यान, आजपासून राज्यातल्या शाळा सुरु झाल्या तरी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याचं समोर आले आहे. विशेषतः इंग्लिश आणि सेमी इंग्लिश माध्यमांची पुस्तकं मिळालेली नाहीत. काही शाळांनी पालकांकडून पैसे घेतले आहेत. मात्र, पुस्तके देण्यात आलेली नाही. बालभारतीकडे वारंवार विचारणा करूनही पुस्तकं उपलब्ध होत नसल्याची तक्रार विक्रेत्यांकडून करण्यात आली आहेत. तर पुस्तकंच नसतील तर मुलांना शाळेत पाठवून फायदा काय, असा सवाल पालकांनी विचारला आहे.

महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 12 च्या शाळा आजपासून कोविड-19 प्रोटोकॉलसह पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत, असे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात सांगितले. BMCने मुंबईत शाळा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली असताना, महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या संबंधित भागातील कोविड-19 परिस्थितीचे मूल्यांकन करुन शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.