सातारा : सातारा जिल्हयात वर्णे येथे शेतात काम करताना शॉक लागून एकाच कुटूंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतकांमध्ये पती-पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. घटनेबाबत मात्र तर्क वितर्क लढवले जात आहेत.
डुकरांपासून संरक्षण होण्यासाठी लावलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसून मृत्यू झाल्याचे काहींचे म्हणणे असून काही जण मात्र, त्याबाबत साशंकता व्यक्त करत आहेत.
सुरेश काळंगे हे पत्नी आणि मुलासमवेत वर्णेतील डोंगर शिवारातील पट्ट्यात शेताकडे गेले होते. विहिरीवरील मोटर सुरू करत असताना सुरेश यांना शॉक बसला. त्यावेळी जवळच असलेली पत्नी संगीता आणि मुलगा सर्वेश त्यांच्या मदतीला धावले. मात्र, त्यांचाही शॉक बसून जागीच मृत्यू झाल्याचीही चर्चा गावात सुरू आहे.
दरम्यान, तिघांच्या मृत्युचे वृत्त गावात पसरताच सर्वत्र गलबला झाला. सुरेश यांचे आई-वडील वृध्द असून ही घटना समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय. सुरेश यांना सुजाता सुरेश काळंगे ही २१ वर्षाची मुलगी असून ती पुणे येथे इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे.