वाल्मिकच्या पत्नीकडे सुरेश धसांचे Video? प्रश्न ऐकताच धस म्हणाले, 'लय धुतल्या तांदळासारखा...'

Suresh Dhas Talks About Walmik Karad Wife: वाल्मिक कराडच्या समर्थकांनाही संक्रांतीच्या दिवशी रस्त्यावर उतरुन वाल्मिक कराडला न्याय द्यावा अशी मागणी करत परळीत काही ठिकाणी दुकानं बंद पडली

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 17, 2025, 07:34 AM IST
वाल्मिकच्या पत्नीकडे सुरेश धसांचे Video? प्रश्न ऐकताच धस म्हणाले, 'लय धुतल्या तांदळासारखा...' title=
धस यांनी त्या प्रश्नाला दिलं उत्तर

Suresh Dhas Talks About Walmik Karad Wife: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशीसंबंधित खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडविरुद्ध मोकका लावण्यात आला असून तो सध्या विषेश तपास दलाच्या कोठडीत आहे. एकीकडे कायदेशीर मार्गाने गोष्टी घडत असतानाच दुसरीकडे कराडच्या समर्थनार्थ त्याचे कुटुंबीय आणि समर्थकांनी थेट रस्त्यावर उतरुन वाल्मिक कराडला न्याय देण्याची मागणी केली आहे. याच आंदोलनामध्ये वाल्मिक कराडची आई, पत्नी मंजिली कराडही सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे. अशातच प्रसारमाध्यमांशी बोलताना वाल्मिक कराडच्या कुटुंबियांना भाजपाचे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर याचा थेट उल्लेख करत काही आरोप केले आहेत. याच आरोपांवरुन धस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सारेच चकित झाले आहेत.

वाल्मिक कराडची पत्नी धसांबद्दल काय म्हणाली?

वाल्मिकची पत्नी मंजिली कराडने प्रसारमाध्यमांशी बोलताना मुद्दाम वाल्मिक कराडला अडकवलं जात असल्याचा आरोप केला आहे. टाक्यांवर चढून, आंदोलनं करुन दबाव आणत मकोका लावण्यात आल्याचा आरोप करताना मंजिली कराडने थेट सुरेश धसांवर निशाणा साधला. सुरेश धसांचेही काही व्हिडीओ आपल्याकडे असून योग्यवेळी ते समोर आणू अशा पद्धतीचा इशाराच मंजिली कराडने दिला. यावरुन धस यांना गुरुवारी पत्रकारांनी प्रश्न विचारला. 

वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेल्या आरोपांवर धस काय म्हणाले?

वाल्मिक कराडच्या पत्नीनेही तुमच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की त्यांच्याकडे तुमचे काही व्हिडीओ आहेत ते योग्यवेळी दाखवेन, असं म्हणत पत्रकारांनी सुरेश दस यांना प्रश्न विचारला. त्यावर धस यांनी, "हे बघा मी त्या माऊलीबद्दल काही बललो का? ती महिला माझी भगिनी आहे. मी माझ्या भगिनीबद्दल काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावर आरोप करावेत. व्हिडीओ हे, ते... कुठेच काही सापडू शकत नाही. लय धुतल्या तांदळासारखा आयुष्य जगलेलो आहे. माझे व्हिडीओ वगैरे कुठेच काही सापडणार नाही," असं सुरेश धस म्हणाले.

...तर त्याला उत्तर देईन

यावर पत्रकारांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या पत्नीनं, "वाल्मिक यांचा वापर केला जातोय वगैरे बोलल्या" असं म्हणत प्रश्न विचारला असता धस यांनी, "मला त्या भगिनीबद्दल काहीच बोलायचं नाहीये. ती माझी बहीण आहे. माऊलीवर मी बोलणार नाही. त्यांच्यापैकी कोणत्या पुरुषाने आरोप केले तर त्याला उत्तर देईन," असं धस म्हणाले.

वाल्मिकच्या आईकडूनही धस यांचा उल्लेख

दरम्यान, वाल्मिक कराडला 14 तारखेला केजमधील कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्या दिवशी त्याच्या आईनेही परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. "माझ्या लेकरावर झालेला अन्याय दूर करा त्याच्यावर दाखल झालेले सगळे गुन्हे खोटे आहेत," असे वाल्मिक कराडच्या आईचं म्हणणं आहे. "सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे या प्रकरणात राजकारण करत असल्याचा आरोप देखील उपस्थित महिला सांगत आहेत," असं पारुबाई कराड यांनी म्हटलं होतं.