Crime News : पाण्याच्या वादावरुन भावकीच जीवावर उठली; दोघांची हत्या तर चौघे गंभीर जखमी

Crime News : दुहेरी हत्याकांडाने सांगली जिल्हा हादरला आहे. विहिरीच्या वादावरुन कोसारी येथे दोघांचा खून करण्यात आला आहे. तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली आहेत

Updated: Mar 11, 2023, 04:34 PM IST
Crime News : पाण्याच्या वादावरुन भावकीच जीवावर उठली; दोघांची हत्या तर चौघे गंभीर जखमी

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : विहिरीच्या वादावरुन (well dispute) सांगली (Sangli) जिल्ह्यातील कोसारी येथे दोघांचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) समोर आला आहे. या दुहेरी हत्याकांडाने सांगली जिल्हा हादरला आहे. या घटनेत चार जण जखमी आहेत. विलास नामदेव यमगर आणि प्रशांत दादासो यमगर अशी मृतांची नावे आहेत. चाकू आणि धारधार शस्त्राने वार करून दोघांचा खून करण्यात आला आहे. या हत्येनंतर हल्लेखोर फरार असून पोलीस (Sangli Police) त्यांचा शोध घेत आहेत.

जत तालुक्यातील कोसारी येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शेत जमिनीतील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून भावकीतीलच कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात दोघांची हत्या झाली आहे. तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे कोसारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विलास नामदेव यमगर (वय 45) आणि प्रशांत दादासो यमगर (वय 23) यांचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, विजय विलास यमगर आणि एका महिलेचा समावेश आहे. या चौघांवर देखील जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह मोठा पोलीस फाटा कोसारी येथे दाखल झाला आहे. या घटनेने गावात प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला आहे. कोसारीपासून पाच किलोमीटर अंतरावर महानोरवाडी येथे यमगर कुटुंबीयांची मोठी शेती आहे. या शेतीतील चार गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून हा वाद झाला.

यमगर यांच्या भावकीतीलच संशयित दहा ते बारा हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार, चाकू, कुऱ्हाड, दगड, दांडक्यांनी जोरदार हल्ला केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपींनी पलायन केले आहे. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली असून चार पोलीस पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहेत.