संघर्षाला हवी साथ : घरात चूल पेटण्याचा प्रश्न, 'ती'च्या यशानं कुटुंबीयांसमोर आशेचा उजेड

पूनमच्या वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून २०१२ मध्ये आत्महत्या केली

Updated: Jul 19, 2019, 09:59 PM IST
संघर्षाला हवी साथ : घरात  चूल पेटण्याचा प्रश्न, 'ती'च्या यशानं कुटुंबीयांसमोर आशेचा उजेड title=

जयेश जगड, झी २४ तास, अकोला : कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून तिच्या वडिलांनी आत्महत्या केली... आईनं मोलमजुरी करून तिला वाढवलं... घरच्या गरीबीवर मात करत तिनं दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवले... ही संघर्षकहाणी आहे अकोला जिल्ह्यातील धामोरी गावच्या पूनम अवटीक हिची... 

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातलं धामोरी गावच्या पूनम अवटीकचं घर बिना दरवाज्यांचं... घरात दारिद्र्याचा अंधार... अगदी चूल पेटण्याचेही वांदे... पूनमच्या वडिलांची दोन एकर शेती... पण कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून २०१२ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर आई गीता हिच्यावर तीन मुलांची जबाबदारी पडली. शेती पिकत नसल्यानं मोलमजुरी करून कसंबसं माऊलीनं मुलांना वाढवलं.

आईच्या या कष्टांचं पूनमनं आज चीज केलंय... दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवून तिनं आईचे कष्टाचे पांग फेडले... आता भविष्यात डॉक्टर होऊन पूनमला समाजाची सेवा करायचीय.

जामठीच्या जवाहर विद्यालयाची ती विद्यार्थिनी... तिच्या यशामध्ये शाळेच्या शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे. पूनमला डॉक्टर व्हायचंय, पण त्यासाठीचा खर्च परवडणार कसा? हा मोठा प्रश्न आहे. पूनमचा दुसरा भाऊ नववीला, तर धाकटा सातवीला आहे. त्या दोघांनाही शिक्षणासाठी आश्रमशाळेत ठेवलंय.

पूनमच्या दहावीच्या शिक्षणासाठी मूर्तिजापूरच्या 'प्रकाशवाट' या संस्थेनं मोलाची मदत केली. पण भविष्यातली शिक्षणासाठी तेवढी मदत पुरेशी नसल्यानं पूनमची आई गीता अवटीक यांनी मदतीसाठी आवाहन केलंय. 

घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे, म्हणून प्रतिभा कधीच लोप पावत नाही... संघर्षावर मात करत पूनमसारखी गुणवान मुलं यश खेचून आणतात. आता गरज आहे ती पूनमसारख्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याची... त्यांना आर्थिक मदत करण्याची...

 

संघर्षाला हवी साथ

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा

झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३

संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९