अश्विनी पवार, झी २४ तास, पुणे : पुण्यात घरं घेताय तर या बातमीकडे लक्ष द्या... कारण पुण्यातल्या पिसोळी इथे बंगला बुक केलेल्या नागरिकांना पाच वर्षांनंतर ना आपल्या बंगल्याचा ताबा मिळालां, ना बुकिंगच्या वेळी भरलेले पैसे मिळाले. पिसोळी इथल्या 'टुकसन्स कन्स्ट्रक्शन' कंपनीच्या 'रोझ पॅराडाईज' या बंगलो सोसायटीचं लाँचिंग २०१४ मध्ये झालं. 'फ्लॅटच्या किंमतीत स्वतःच्या बंगल्याचं स्वप्न पूर्ण करा' या जाहिरातीला भुलून अनेकांनी इथं बंगले बुकही केले. बंगल्याचा ताबा लवकर हवा असेल तर जास्त पैसे भरा असं बिल्डरकडून ग्राहकांना सांगण्यात आलं. मात्र ज्या बंगल्यांचा ताबा २०१६ मध्ये मिळायला हवा होता त्यांचं अजून बांधकामही सुरु झालेलं नाही. एवढंच नाही तर बुकिंगची रक्कमही परत करायला बिल्डर टाळाटाळ करत असून गेल्या काही महिन्यांपासून टुकसन्स कंपनीला टाळं लागलंय.
यामुळे, आपल्या घरासाठी गुंतवणूक केलेले नागरिक मात्र पेचात सापडलेत. याबाबत 'टुकसन्स कन्स्ट्रक्शन' कंपनीचे मालक हेमंत बुद्धीमंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आता ग्राहकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
'रोझ पॅराडाईज' बंगलो सोसायटीमध्ये ७० जणांनी बंगले बुक केले होते. यात जवळपास ७० ते ८० लाखांची फसवणूक झाल्याचं सध्या पुढे आलंय. मात्र पुण्यातली ही पहिली घटना नाही, त्यामुळे कोणतीही स्थावर मालमत्ता घेताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.