Shiv Jayanti 2023 : राज्यासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. दरम्यान, शिवनेरी (Shivneri Fort) किल्ल्यावर श्री शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवप्रेमींना दर्शनासाठी न सोडल्याने छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरच माईक हाती घेत छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला सुनावले.
"किल्ले शिवनेरीवर येत असताना मला शिवभक्तांनी अडवलं. तेव्हा त्यांनी मला विचारले की व्हीआयपी पासेस का? आम्ही सुद्धा शिवभक्त असून आम्हाला अडवलं जात आहे. तुम्ही दर्शन घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत येणार असे त्यांनी मला सांगितले. तुम्हाला शासकीय कार्यक्रम करायचा असेल तर करा पण दुजाभाव नको. वर येऊन दर्शन घेऊ दिलं जात नाही हे चालणार नाही. दरवर्षी हेच होत आहे. आम्ही किती सहन करायचे? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा दुजाभाव करु नका," असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांना दिला.
"रायगडावर नतमस्कत होण्यासाठी परवानगी दिली जाते मात्र इथे का नाही? इथे राज्याचे पुरातत्व खाते आहे. पण हा कुठला नियम आहे? रायगड किल्ल्याप्रमाणे बाकीच्या गडकोटांचे संवर्धन कसे करणार याचेही उत्तर आम्हाला पाहिजे आहे. कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला सर्वांना आत जाऊन दर्शन घेण्याची परवानगी हवीय. पुढच्या वर्षी याचे नियोजन करा," असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.