शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या खास शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून खास शुभेच्छा देण्यात आल्यात.  

Updated: Dec 12, 2020, 08:30 AM IST
शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या खास शुभेच्छा  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून खास शुभेच्छा देण्यात आल्यात. मात्र शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना, काँग्रेसला मात्र चिमटे काढण्यात आलेत. शरद पवार म्हणजे हत्तीची चाल आणि वजिराचा रूबाब असलेले नेतृत्व आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. अशावेळी शरद पवार ( Sharad Pawar) देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करत आहेत, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

८० वर्षांचे होऊनही शरद पवार ( Sharad Pawar) यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!

देशाचे सगळ्यात अनुभवी नेते, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार शरद पवार हे आज रोजी ८० वर्षांचे झाले आहेत. कोविडचे संकट नसते तर पवार यांच्या ८० व्या वर्षपूर्तीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला असता, त्यांचे अनेक नागरी सत्कार झाले असते, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असते. प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेल्या पवारांनी चाहत्यांच्या या उत्साहावर बंधने घातली आहेत. ‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. ८० व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले.

 यशवंतरावांप्रमाणेच माणसे जमवण्याचा व सांभाळण्याचा छंद पवारांना आहे. त्या छंदास कोणी बेरजेचे राजकारण म्हणत असतील तर पवार अनेक वर्षे ही बेरीज करीत आहेत. राज्यातील ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज आहे. १९६२ च्या सुमारास युवक नेते म्हणून त्यांचा उदय झाला. पुलोदचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, काँग्रेस सोडलेले व पुन्हा राजीव गांधींच्या उपस्थितीत संभाजीनगरात सामील झालेले पवार आपण पाहिले. शरद पवार लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. पवारांच्या चातुर्यानेच वाजपेयींचे सरकार एका मताने पडले, पण संसदेतील या नेत्यास विश्वासात न घेता सोनिया गांधी राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करायला गेल्या त्या अस्वस्थतेतूनवैचारिक मुद्द्यांवर काँग्रेस पुन्हा सोडणारे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून पुन्हा काँग्रेसच्याच बरोबरीने स्वतंत्र बाण्याचे राजकारण करणारे शरद पवार देशाने पाहिले. 

नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यागून पवार हे राष्ट्रीय राजकारणाच्या आखाडय़ात पूर्ण तयारीनेच उतरले. राजीव गांधींच्या हत्येने गांधी परिवार राजकारणातून बाहेर पडलेला, काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन, दुर्बल झालेला, संसदीय काँग्रेस पक्षात तेव्हा मतदान झाले असते तर पवार नेतेपदी बहुमताने निवडून आले असते, पण वानप्रस्थाश्रमात निघालेल्या नरसिंह रावांना उत्तरेच्या लॉबीने पुढे केले व पवारांचा मार्ग अडवला. दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली. संरक्षणमंत्री, कृषीमंत्री म्हणून केंद्रातली पवारांची कारकीर्द दमदारच होती. पवारांवर कायम संशय घेण्यात ज्यांनी धन्यता मानली ते पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे राजकारणातून नामशेष झाले. 

शरद पवार हे काय आहे रसायन?

शरद पवार. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणातलं अग्रगण्य नाव. शरद पवार हे काय रसायन आहे, हे जाणून घ्यायला साताऱ्यातील पावसाची सभा पुरेशी आहे. विधानसभा निवडणुकीचं चित्र पालटलं ते या एका सभेने. पवारांनी साताऱ्याच्या सभेत भर पावसात भाषण सुरूच ठेवलं आणि केवळ पाठिराख्यांचीच नव्हे, तर विरोधकांची मनं जिंकली, काही प्रमाणात मतंही.
 
त्यानंतर लागलेल्या निकालांनंतर महाराष्ट्रानं पाहिले आणि अनुभवले पवारांचे निखळ राजकारण. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसायला लागलं ते पवारांच्या रणनीतीमुळे. संपूर्ण विरोधी विचारसरणी असलेल्या तीन पक्षांना त्यांनी एकत्र आणलं... महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा जो प्रयोग झाला, त्याचे पटकथा लेखक-दिग्दर्शक होते ते शरद पवारच. 

दरम्यानच्या काळात अजित पवारांनी केलेलं बंड, फडणवीसांसोबत त्यांचा शपथविधी आणि शरद पवारांनी शिताफीनं मोडून काढलेलं बंड हेदेखील महाराष्ट्रानं पाहिलं... अर्थात, अवघ्या देशाला धक्का देणाऱ्या या लघुकथेचे पटकथाकारही पवारच असल्याची कुजबुजही होते. अशा अनेक कथा पवारांच्या नावावर खपवल्या जातात. 'नशिब माझं... किल्लारीचा भूकंप पवरांमुळे झाला, असं विरोधक म्हणत नाहीत' असं स्वतः पवार एकदा उपरोधानं म्हणाले होते ते त्यामुळेच.
 
आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आहे. यातल्या परस्परविरोधी मतप्रवाह असलेल्या तिन्ही पक्षांना बांधून ठेवणारा एक समान धागा आहे. त्याचं नाव शरद पवार. भाजपचा उंट ज्या तंबूमध्ये शिरू पाहतोय, त्या तंबूचा मधला भक्कम खांब म्हणजे शरद पवार. सगळ्या देशात ज्यांच्या राजकारणाचा दबदबा आहे त्या मोदी-शाह जोडीला टक्कर देणारे तुल्यबळ पैलवान म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राच्या प्रत्येक स्थित्यंतराचा साक्षीदार असलेले. राजकारणाचं अर्ध शतक पाहिलेले. महाराष्ट्राचा कोपरान कोपरा माहिती असलेले. मुरब्बी राजकारणी. शरद पवार यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.