गुलाबराव पाटलांच्या आक्षेपार्ह विधानावर रुपाली चाकणकर यांनी काय दिला इशारा पाहा

महाविकास आघाडीत ठिणगी...गुलाबराव पाटलांवर कायदेशीर कारवाई करणार, रुपाली चाकणकर आक्रमक

Updated: Dec 19, 2021, 09:17 PM IST
गुलाबराव पाटलांच्या आक्षेपार्ह विधानावर रुपाली चाकणकर यांनी काय दिला इशारा पाहा title=

मुंबई: जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पेटली आहे. यावरून वादाला तोंड फुटलं असून आता भाजपने मंत्री पाटील यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा मंत्री पाटील यांना दिला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही आक्रमक पवित्रा घेत मंत्री पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

काय म्हणाल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा?

गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे निषेधार्ह असून त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली. 

एखाद्या वस्तूची तुलना महिलांच्या रंगरूपाशी करणं हे नीचपणाचं लक्षण आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देत आहात हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आपण आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा योग्य कारवाई करण्यात येईल असे त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांच्याकडून राजीनाम्याची मागणी

मंत्री गुलाबराव पाटील यांना हेमा मालिनी यांचे गाल दिसत आहेत. पोलीस यंत्रणेला गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यात महिलांचा विनयभंग दिसत नाही का? असा संतप्त सवाल करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा.

तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. शिवसेनाच्या मंत्र्यांना नेमकं झालंय काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही तर, गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.