जळगाव: नगरपंचायत निवडणुकांचे वारे वाहात आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या व्यक्तव्यामुळे आता संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे.
गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनी यांचा संदर्भ देत आक्षेपार्ह विधान केलं. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना हे विधान केलं आहे.
काय म्हणाले शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरसभेत हेमा मालिनी यांच्या गालांची तुलना रस्त्यांशी केली. हेमा मालिनी यांच्या गालांसारखे रस्ते मी केले, असं ते सभेत बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी इतर मतदारसंघातील आमदारांना आव्हान दिलं आहे.
'माझे 30 वर्ष आमदार राहिलेल्यांना आव्हान आहे त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहवं, की मी काय विकास केला. हेमा मालिनी यांच्या गालासारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता?'
गुलाबराव पाटील यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तर त्यांनी जाहीर माफी मागावी असंही मागणी केली जात आहे. याशिवाय त्यांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे.