प्रवीण दरेकर यांना 'ते' वक्तव्य भोवणार, रुपाली चाकणकर यांनी दाखल केली तक्रार

प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

Updated: Sep 22, 2021, 01:46 PM IST
प्रवीण दरेकर यांना 'ते' वक्तव्य भोवणार, रुपाली चाकणकर यांनी दाखल केली तक्रार title=

पुणे : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शिरुर इथे एका कार्यक्रमात प्रवीण दरेकर यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुके घेणार पक्ष' असं वक्तव्य केलं होतं. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी. कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील एकतेला आणि उज्ज्वल परंपरेला नख लावायचं काम करत आहे, सातत्याने महाराष्ट्राची बदनामी कशी करता येईल, याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी अतिशय खलाची पातळी भाजपाने गाठली आहे. भाजप हा वैयक्तिक स्वार्थासाठी, सत्तेच्या लालसासाठी ज्या पद्धतीने खालच्या पातळीचं राजकारण करत आहे, त्यांनी आतापर्यंत कळस गाठलेला आहे, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये महिलांविषयी अतिशय अश्लील विधान केलं. जाहीर सभेत बोलत असताना महिलांना लज्जा निर्माण होईल, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. या वक्तव्याविरोधात राज्यभरात महिलांना निषेध व्यक्त केला, रोष व्यक्त केला. पण प्रवीण दरेकर यांनी माफी न मागता या गोष्टीला आपण इतकं महत्त्व देत नाही, असं वक्तव्य केलं. म्हणून आपण सिंहगड पोलीस ठाण्यात प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. कायद्याच्या चौकटीतून न्याय मिळेल याची खात्री वाटते, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य काय होतं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं होतं. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांचा प्रवेश झाला. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला टोला लगावला होता.