Karnataka Accident : कर्नाटकातील (Karnataka) कोप्पल येथून एक धक्कादायक रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत कारमधील सर्व 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Karnataka Police) घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या अपघातात महाराष्ट्रातल्या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापुरातील चारही जण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. तर यामध्ये त्यांच्या दोन नातेवाईकांचा देखील मृत्यू झाला आहे.
सोलापुरातून बेंगळुरूकडे कारमधून निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. कार अपघातामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील पती-पत्नी, त्यांची दोन लहान मुलांच अशा चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अन्य दोघेजण हे इंडी तालुक्यातील नंद्राळ गावचे असल्याचे समोर आले आहे. राघवेंद्र सुभाष कांबळे (25), जानू राघवेंद्र कांबळे (23), राकेश राघवेंद्र कांबळे (5) व रश्मिका राघवेंद्र कांबळे (2) अशी मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली आहे.
राघवेंद्र हे आपल्या कुटुंबासह दरवर्षीप्रमाणे कर्नाटकात यल्लमा देवीच्या यात्रेसाठी गेले होते. त्यानंतर ते बहिणीच्या नातेवाईकांना घेऊन कामानिमित्त कारने बंगळुरुकडे निघाले होते. त्यावेळी कोप्पल जिल्ह्यात होस्पेटजवळ असलेल्या दोट्टीहाळ येथे राघवेंद्र यांची कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या धडकेत कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक तामिळनाडूहून गुजरातच्या दिशेने निघाला होता. समोरासमोर झालेल्या धडकेत संपूर्ण कार ट्रकच्या समोरील भागावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढावी लागली. त्यानंर सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
Karnataka | 6 people died after a car collided with a lorry in Koppal district. CM Siddaramaiah has announced Rs 2 lakhs compensation to the kin of victims: Karnataka CMO pic.twitter.com/eeBQbVmRei
— ANI (@ANI) May 28, 2023
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.