ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होत आहे. या सभेला 'लक्ष्यभेदी जाहीर सभा' असं शिर्षक दिल्यानं, ठाकरे यांचे नवं लक्ष्य कोण असेल याबाबत आता तर्क लढवले जाऊ लागलेत.
पाकिस्तानी-बांगलादेशी घुसखोर आणि त्यांना राज्यात आश्रय देणारे सरकारी अधिकारी यांच्यावर ठाकरे निशाणा साधण्याची दाट शक्यता व्यक्त होतेय. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही ठाकरे आपली भूमिका मांडण्याचीही शक्यता आहे.
ठाण्यातील या जाहीर सभेच्या जागेवरून वाद निर्माण झाला होता. स्टेशन रोड परिसरात सभा घेण्यासाठी मनसे नेते आग्रही होते. मात्र आता हा वाद संपुष्टात आला असून गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर संध्याकाळी ही सभा होतेय. सभेच्या निमित्तानं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तयारी पूर्ण केली आहे.