Raj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगरमधील पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना थेट आव्हान दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा माझ्या मराठवाडा दौऱ्याची काही संबंधही नव्हता. मात्र या दौऱ्यामध्ये जरांगे-पाटलांच्या आंदोलनामधून शरद पवार आणि उद्धव ठाकरे कशाप्रकारे राजकारण करत आहेत हे मला कळलं, असं राज यांनी म्हटलं आहे. इतक्यावरच न थांबला आपण ठरवलं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना विधानसभेला राज्यात एकही सभा घेता येणार नाही, असा इशाराच दिला आहे.
मराठवड्यात लोकसभेला झालेलं मतदान पवार-ठाकरेंसाठी नाही तर...
"लोकसभेचा निर्णय लागल्याने मराठावाड्यात आपल्याला मतदान झालं असं त्यांना वाटत आहे. शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी हे समजून घ्यायला पाहिजे की ते मतदान मोदी आणि अमित शाहांविरुद्ध झालेलं होतं. त्यांच्या प्रेमाखातर मिळालेलं मतदान नव्हतं. विरोधी पक्ष जिंकत नसतो. सत्ताधारी हरत असतो असं मी नेहमी सांगतो. नाराजीतून त्यांना मतं मिळालं. मुस्लिमांनी मोदीविरुद्ध मतदान केलं. दलित समाजाने संविधान बदलणार याविरुद्ध मतदान झालं. ते मतदान त्यांच्याप्रेमाखातीर झालं तर ते तसं नाही. विधानसभेत अशीच खेळी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," असं राज ठाकरे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवारांच्या डोक्यात काय सुरु आहे?
"शरद पवारांसारखा 82 वर्षाचा माणूस म्हणतो महाराष्ट्रात मणिपूर होईल. मणिपूर होऊ नये असं वाटलं पाहिजे तर ते म्हणतात मणिपूर होईल म्हणजे यांच्या डोक्यात काय सुरु आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढल्या तीन-साडेतीन महिन्यात मराठवाड्यात जेवढ्या काय घडवायच्या गोष्टी आहेत त्या घडवतील," असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
नक्की वाचा >> राज ठाकरेंचा ताफा आडवू नका, गरज पडल्यास मुंबईत जाऊन गचांडी पकडून मराठा...: मनोज जरांगे
राग फडणवीसांवर असेल तर..
"जेम्स लेन प्रकरणापासून त्यांनी जातीच्या राजकारणाला सुरुवात केली. जातीबद्दल प्रेम वर्षानूवर्ष आहे. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करत पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केल्यापासून सुरु झालं. यांनी माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. उद्या जर माझं मोहोळ उठलं ना त्यांना विधानसभा निवडणुकीला एक सभाही घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये," असा इशारा राज ठाकरेंनी पवार-ठाकरेंना दिला आहे. "मी मागे म्हटलेलं यांच्याकडे प्रस्थापित आहेत. माझ्याकडे विस्थापित आहेत. समाजात विष कालवून यांना कोणतं राजकारण करायचं आहे. यांचा बेसच आहे. त्यांनी निवडून आलेल्या खासदारांच्या संख्येवर जाऊ नये. राग फडणवीसांवर असेल तर राजकारणावर त्या पद्धतीने बोला. समाजात कशाला भांडणं लावतात?" असंही राज ठाकरे म्हणाले.
नक्की वाचा >> 'जरांगेच्या आंदोलनामागून शरद पवार-उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं...'; राज ठाकरेंचे गंभीर आरोप
...मग तुम्हाला आडवलं कोणी?
"2003 मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पहिला मोर्चा मुंबईत आलेला. व्यासपीठावर जिथे मोर्चा आडवला तिथे भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक होते. सर्वांनी एकमुखाने सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग आडवलं कोणी पुढे. मग तुम्हाला थांबवलं कोणी? 15-20 वर्ष झालं आडवलं कोणी तुम्हाला?" असा सवाल राज यांनी सर्व पक्षांना विचारला आहे.
'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले