मुंबई : उकाड्यामुळे लोकं हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वचं पावलाची प्रतीक्षा करत आहे. यावर्षी सरासरीच्या १०१ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात चार टक्क्यांपर्यंत वाढ-घट होऊ शकते. हवामान खात्याने दुस-या टप्प्यातले अंदाज जाहीर केले आहेत. देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण चांगलं असेल तर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गोव्यामध्ये आठ जूनच्या आसपास तर सिंधुदुर्ग, दक्षिण कोकणमध्ये दहा जूनच्या आसपास मोसमी पावसाचे आगमन होईल. मुंबईत १० ते १५ जूनच्या दरम्यान मोसमी पावसाचे आगमन अपेक्षित आहे. आठ जूननंतर कोकण आणि मुंबईमध्ये पावसात हळूहळू वाढ होईल. उर्वरित राज्यात १३ जूनच्या आधी मान्सून अपेक्षित नाही, अशीच सध्याची हवामानची स्थिती दर्शवत आहे.
त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन होईपर्यंत म्हणजेच किमान दहा जूनपर्यंत उकाडा सुरूच राहणार आहे. यादरम्यान विदर्भात तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. याकाळात शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, कारण या आठवडय़ातील पाऊस हा पूर्व मोसमी वादळी पाऊस असणार आहे. हा पाऊस सगळीकडे सारखा पडत नाही. तापमान मात्र अधिक राहील.