Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 27, 2024, 06:41 AM IST
Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान? title=

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे. राज्यातील बहुतेक भागांमध्ये तापमान 40 अंशाच्या दरम्यान पोहोचल्याचं दिसून येतंय. याशिवाय काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकामी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी पाऊस झाला. 

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोव्याव्यतिरिक्त पुढील तीन ते चार दिवस विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणातील हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणात पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, पुढील ३- ४ तासांत सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून निर्जन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात अकोला बुलढाणा आणि वाशिममध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि परिसरात 29 एप्रिलपर्यंत दुपारी किंवा संध्याकाळी आकाश बहुतांशी निरभ्र आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.