रत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 13, 2017, 07:36 PM IST
रत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती title=

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.

मच्छीमार बोट 'आयशाबी' दुर्घटनाग्रस्त झाली होती. तटरक्षक दलाची बोट आणि स्थानिक जयदीप तोडणकर यांच्या बोटीच्या सहय्याने बेपत्ता दोघांना शोध घेण्यात आला.  

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४ झाला आहे. हसन पठाण आणि जैनुद्दीन पठाण यांचे मृतदेह हाती लागले होते, अशी माहिती तहसीलदार मश्चिंद्र सुकटे यांनी दिली.

दरम्यान, काल रात्री ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकटासह वादळी पावसाने रत्नागिरीला झोडपले. खेड तालुक्यात एका घरावर वीज पडून नुकसान झाले आहे. पाऊस सुरू होताच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.

वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. खेड तालुक्यात मोठे नुकसान झालेय. तर चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथील मदन कदम यांच्या घराच्या लगतचा बांध कोसळून नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात तळवली येथे रघुनाथ गायकर यांच्या घराचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात काटवली येथे गोठ्याचे नुकसान झाले आहे. तसेच घरांचेही नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यात रंजना मांजरेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात ८६ मि.मी. पावसाची नोंद झाली.