लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाची हजेरी, काही घरांचं नुकसान

 लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली.

Updated: Jun 24, 2019, 03:13 PM IST
लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाची हजेरी, काही घरांचं नुकसान title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात मध्यरात्री उशिरा ते पहाटेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. उदगीर शहर आणि परिसरातही मोठा पाऊस झाला. उदगीर शहरातील कृष्ण नगर परिसरातील येनकी-मानकी रोडवरील शंकर भगवान वाघमारे यांचे पत्र्याच्या घराचे मोठे नुकसान झाले. रात्री दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस चालू झाल्याने धोंडू तात्या आश्रम शाळेची कंपाऊंडची भिंत शंकर वाघमारे यांच्या घरावर कोसळली. ज्यात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. 

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाघमारे यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. धोंडू तात्या आश्रम शाळेत पावसाचे पाणी साचल्यामुळे भिंत कोसळून त्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाघमारे यांचे संसार उपयोगी साहित्य, कपडे, धान्य वाहून गेले. ज्यात एका पेटीतील दागिने आणि काही रक्कमही वाहून गेली असल्याचा दावाही वाघमारे करीत आहेत. तर पाण्याच्या प्रवाहात वाघमारे यांचा बांधून ठेवलेला पाळीव कुत्राही यात मृत झालाय. 

मॉन्सूनच्या पहिल्याच पावसात उदगीर शहरातील कृष्ण नगर मध्ये झालेल्या नुकसानीची शासनाने भरपाई देण्याची मागणी शंकर वाघमारे यांनी केली आहे. दरम्यान उदगीर तालुक्यात कालच्या पावसाची २९ मिमी इतकी नोंद झाली आहे. तर सर्वाधिक पाऊस हा शिरूर अनंतपाळ ४१ मिमी आणि निलंगा तालुक्यात २४ मिमी इतकी नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या एकूण पावसाची नोंद ही जवळपास १४ मिमी इतकी झाली आहे.