पुणे : पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार आहेत. १५ जानेवारी मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पुणतांब्यात मशाल पेटवत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. सातबारा कोरा करणं आणि कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी पुन्हा हे आंदोलन छेडलं जाणार आहे. ३ जून २०१७ ला सरकारनं दिलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण न झाल्यामुळं पुन्हा हे आंदोलन छेडण्यात येतं आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी उद्या पुणतांब्यात शेतकऱ्यांची बैठक होईल. आंदोलनाची तारीख आणि स्वरुपदेखील उद्याच निश्चित होणार आहे. किसान क्रांती राज्य समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या दीड वर्षात समोर येऊन कधीही आंदोलनात सहभागी न होणाऱ्या किसान क्रांतीवर आता शेतकरी किती भरवसा ठेवतील आणि ऐन निवडणुकीच्या काळात हे आंदोलन कशासाठी असे प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
शेतकरी संपामुळे पुणतांबे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या गावात चांगदेव महाराजांची समाधी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेले हे गाव आधीपासूनच चळवळींचं केंद्र मानलं जातं. गोदावरी नदीच्या काठी हे गाव वसलं आहे. स्वातंत्र्य चळवळीत या गावातील अनेकांनी भाग घेतला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रामराव बोर्डे हे येथेच राहत होते. स्वातंत्र्यापूर्वी या गावात १९४० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा सुरु झाली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांनी देखील या गावाला भेट दिली होती.