हेमंत चापुडे, झी मीडीया, पुणे : धक्कादायक आणि संतापजनक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. शाळेची फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना डांबून ठेवले. पुण्यातील एका प्रसिद्ध इंटरनॅशनल स्कूलने हे तालीबानी कृत्य केले आहे (The Lexicon International School Wagholi, Pune).
शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. फी भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना सोडणार नाही, असं शाळा व्यवस्थापनानं धमकावल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारानंतर संतप्त पालकांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शाळेविरोधात तक्रार दिली. शाळेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे. फी साठी शाळेने विद्यार्थ्यांना धरले वेठीस धरल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
लेक्सिकॉन इंटरनॅशनल ही पुण्यातील नामांकित शाळा आहे. या शाळेकडून भरपूर फी घेतली जाते. शिक्षणाच्या नावखाली अनेक प्रकारचे शुल्क वसुल केला जातात. त्यातच आता फी वसुल करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने धक्कादायक कृत्य केले आहे. किती विद्यार्थांना शाळा व्यवस्थापनाने डांबून ठेवले तसेच ते कोणत्या इयत्तेत शिकतात याबाबत काही माहिती समोर आलेली नाही.
असाच काहीसा प्रकार मागील आठवड्यात जळगावमध्ये देखील घडला होता. शाळेची फी न भरल्यामुळे ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवण्यात आले होते. जळगाव मधील विद्या इंग्लिश स्कूल मध्ये घडला आहे. या घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनावर संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली. शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा व्यवस्थापनाने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना बाजूला काढले. जवळपास 50 विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने कडाक्याच्या थंडीत बाहेर शाळेच्या प्रांगणात बसवले. यानंतर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत गोंधळ घातला.