पुणे : अंमली पदार्थाचे सेवन करून भर रस्त्यात नंगानाच करणे आणि महिलांचा विनयभंग करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीस पुणेकरांनी चांगलाच धडा शिकवला. हा व्यक्ती मुळचा नायजेरियन असून, त्याने रस्त्यावरील काही गाड्यांच्या काचा फोडल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांकडे पाहूनही त्याने अश्लिल हावभाव केले. हे पाहून लोकांचा संताप अनावर झाला.
बनुदुकी सलीमा रचेत असे या व्यक्तिचे नाव आहे. रचेत हा विद्यार्थी म्हणून पुण्यात वास्तव्यास आहे. तो भारती विद्यापीठात शिकतो. दरम्यान, बनुदुकी याने रस्ताने जाताना अचानकपणे अंगावरील कपडे उतरवले आणि तो इकडे-तिकडे पळू लागला. काही वेळातच त्याने रस्त्यावरील गाड्यांना लक्ष करण्यास सुरू केले. त्याने गाड्यांच्या काच फोडल्या. त्याचा हा नंगानाच इतक्यावरच थांबला नाही. त्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांकडे पाहून अश्लिल हावभावही करण्यास सुरूवात केली. त्याचे हे वर्तन पाहून लोकांचा संताप अनावर झाला. लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याच्या अंगाभोवती टॉवेल गुंडाळला आणि पोलिसांना कॉल केला.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉ कॉलेज रोडवर शुक्रवारी हा प्रकार घडला. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या व्यक्तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी तो पूर्णपणे अंमली पदार्थाच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्याचा स्वत:वर ताबा नव्हता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.