पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता.   

शिवराज यादव | Updated: Jun 1, 2024, 06:17 PM IST
पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश title=

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली अखेर दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता. पुणे पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक केली होती. त्यांच्याआधी हॉस्पिटमधील डॉक्टर आणि वॉर्डबॉयला अटक करण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी मुलाची आई, वडील आणि आजोबा यांना बेड्या ठोकल्या आहेत. यादरम्यान त्यांची चौकशी केली जात आहे. आज चौकशी कऱण्यात आली असता मुलाच्या आईने चाचणासाठी आपलं रक्त दिल्याचं सांगितलं आहे. 

पुणे पोलिसांकडून पोर्शे अपघात प्रकरणी चौकशी केली जात आहे. आज गुन्हे शाखेकडून मुलासमोर आईची चौकशी कऱण्यात आली. यावेळी सुरुवातीला शिवानी अग्रवालने उडवाउडवीची उत्तरं दिली. दरम्यान कठोरपणे चौकशी केली असता अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आपलं रक्त दिल्याची कबुली शिवानी अग्रवालने दिली आहे. आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल दोघांनी मिळून हा कट रचला होता.

शिवानी आणि विशाल हे दोघे ही ससून रुग्णालयात अपघातादिवशी उपस्थित होते. ससूनच्या सीसीटीव्हीत विशाल अग्रवालही आढळला होता. दरम्यान माझा मुलगाच गाडी चालवत होता, याचीही आई-वडिलांनी चौकशीत कबुली दिली आहे.

नेमकी घटना काय?

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने 19 मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी चालकाला चोप दिला. दरम्यान घटनास्थळावरचं एक सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये कार किती वेगात होती हे स्पष्टपणे दिसत आहे.

या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 15 तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मंजूर करताना निबंध लिहिण्याची अट घातल्याने संताप व्यक्त झाला होता.

विशाल अग्रवालल दुसऱ्या गुन्ह्यात अटक

विशाल अग्रवालला आज दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. त्याची ब्लड सॅम्पल बदलल्याच्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी केली जाईल. ड्रायव्हर अपहरण आणि धमकी प्रकरणात विशाल अग्रवालची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याला पोलीस आज पुन्हा ताब्यात घेऊन अटक करणार आहेत. त्यामुळे विशाल अग्रवालला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.