पुणे: सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. सुसाईड नोट लिहून तणावातून मुक्त होण्यासाठी या तरुणानं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुसाईड नोट अंगावर काटा आणणारी आहे. आयुष्य संपवण्याचा निर्णय घेताना लिहिलेले हे शब्द काळजाला अक्षरश: रुतत आहेत.
'पत्नीसह सासरच्या जाचाला आणि वारंवार होणा-या पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या करतो आहे. आई, तू काळजी करू नकोस. मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ कर. त्याची काळजी घे असं या नोटमध्ये लिहून त्यानं या जगाचा निरोप घेतला.
सासरकडून वारंवार होणा-या पैशांच्या मागणीला कंटाळून निखिल धोत्रे यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर-गोखलेनगर येथे सुगम चाळीमध्ये ही घटना घडली. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरी पत्नीच्या ओढणीचा फास करून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
निखिल धोत्रे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांकडून सुसाईट नोटवरून चौकशी सुरू आहे. सासरच्या जाचाला कंटाळून जावयाला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागणं निश्चितच चिंताजनक आहे.