मृत्यूला चकवा देऊन घरी परतत असतानाच तरुणाचा मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक घटना

Pune News : बारामती शहराच्या रिंगरोड परिसरात रुग्णालयातून घरी परतणाऱ्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. रस्ते अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आकाश नेटके | Updated: Oct 8, 2023, 04:05 PM IST
मृत्यूला चकवा देऊन घरी परतत असतानाच तरुणाचा मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक घटना title=

Baramati Accident : बारामतीमधून (Baramati News) अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतणाऱ्या एका तरुणावर रस्त्यातच काळाने घाला घातला आहे. या अपघातात (Accident News) तरुणाची आई गंभीर जखमी झाली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतणाऱ्या या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकदा मृत्यूला चकवा दिल्यानंतर तरुणाचा अपघातात जीव गेला आहे. या घटनेमुळे बारामती शहरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस विजय कासवे (21 वर्ष) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर राधिका कासवे असं अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या आईचं नाव आहे. खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तेजस त्याच्या आईसोबत घरी परतत होता. मात्र वाटेतच त्याला मृत्यूनं गाठलं आहे. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे.

अपघातात मृत्यू पावलेल्या तेजसवर बारामतीमधील एका खसागी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळाल्याने तो रिंगरोडवरून आपल्या आईसोबत दुचाकीवरून घरी परतत होता. मात्र याचवेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातामध्ये तेजसचा जागीच मृत्यू झाला. तर तेजसची आई गंभीर जखमी झाली. जखमी झालेल्या राधिका कासवे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन जणांना अटक

पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. भरधाव कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू प्रकरणात कार चालकासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघातावेळी कार चालक आणि साथीदार मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघडकीस आलं आहे. भरधाव कारने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजता वाजता पुण्यातील झेड ब्रीज जवळ घडली होती. याप्रकरणी वाहनचालक उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) आणि नटराज बाबूराव सूर्यवंशी (वय 44 ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 वाजता केळकर रस्त्यावरून भरधाव कार टिळक चौकाकडे चालली होती. बाबा भिडे पुलाजवळील चौकापासून काही अंतरावर भरधाव कारने हिंदू महिला आश्रमाच्या जुन्या इमारतीच्या कोपऱ्याजवळ पाच ते सहा वाहनांना धडक दिली. त्यावेळी पादचारी विश्वनाथ राजोपाध्ये यांना कारची जोरात धडक बसली आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजोपाध्ये यांचा मृत्यू झाला.